खोल, अंधाऱ्या विहिरीत पडलेल्या एका महिलेची तब्बल ५४ तासांनंतर सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. चीनमध्ये एक ४८ वर्षांची महिला विहिरीत पडल्यानंतर जवळपास ५४ तास विहिरीतील कीटक, सर्प आणि पाण्याचा सामना करत मृत्यूशी झुंज देत होती. मात्र तिने हार मानली नाही आणि ती मृत्यूशी झुंजत राहिली. अखेरीस बचाव पथकाने तिला जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले.
याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार ही दुर्घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. क्वानझोऊ येथे राहणारी चीन नावाची महिला जंगलात फिरायला गेली होती. तिथे गवताने झाकलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने ती या खड्ड्यात पडली. ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाधोश सुरू केली. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी मुलाने जिनजियांग रुइतोंग ब्लू स्काय एमर्जन्सी रेस्कू सेंटरकडे मदत मागितली.
त्यानंतर १० सदस्यीय टीमने ड्रोन आणि थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध सुरू केला. त्यानंतर दुपारी १.४५ च्या सुमारास शोध पथकाला एका विहिरीतून मानवी आवाज ऐकू आला. त्यानंतर तपास पथकाने झाडी दूर केली असता त्यांना बेपत्ता झालेली चिन नावाची महिला दिसून आली. ती पाण्यामध्ये अर्धी बुडालेली होती. तसेच ती या अंधाऱ्या विहिरीत निसरड्या भिंतीवरील फटींना पकडून जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होती.
दरम्यान, बचाव पथकाने या महिलेला जिवंत बाहेर काढल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासणी केली असता तिला गंभीर दुखापती झालेल्या दिसून आल्या. मात्र आता तिची प्रकृती स्थिर असून, ती लवकरच पूर्णपणे बरी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.