Donald Trump's Stance on Ukraine and Russia War: निवडणुकीत युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचे आश्वासन देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. 'रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. प्रदीर्घ आणि खूपच सकारात्मक चर्चा झाली', असे ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधला. पुतीन यांच्यासोबत जवळपास दीड तास ट्रम्प यांची चर्चा झाली. त्याबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, "पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यासोबत युद्ध विराम करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पुतीन यांच्या शिष्टमंडळासोबत तत्काळ चर्चा करण्यावर सहमती बनली आहे. आम्ही सौदी अरेबियात भेटू."
युक्रेनेमध्ये निवडणूक होण्याची गरज असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे बेल्जियममध्ये असलेल्या नाटोच्या मुख्यालयात बोलताना अमेरिेकेच सरंक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आता युक्रेनला पूर्वीसारखी मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि लष्करी मदत करणार नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांना रशिया दौऱ्याचे निमंत्रण
दरम्यान, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी अशी माहिती दिली की, ट्रम्प आणि पुतीन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशांना भेटी देण्याबद्दल सहमती दर्शवली. पुतीन यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाच्या दौऱ्याचे निमंत्रण दिले.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी माहिती दिली. "माझी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलणी झाली. दोन्ही देश मिळून रशियाच्या आक्रमणाला रोखण्याबद्दल, तसेच स्थिर, विश्वसनीय शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात पुढे कशी पावले टाकायची, यासंदर्भात आराखडा तयार करत आहेत", असे झेलेन्स्की म्हणाले.