केरळच्या पलक्कड येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय निमिषा प्रियाला येत्या १६ जुलैला येमेनमध्ये फाशी दिली जाणार आहे. - का? त्याची एक माेठी आणि आपबीती कहाणी आहे. भारत सरकारही यात मध्यस्थी करतं आहे; पण काय होईल ते काहीच सांगता येत नाही.
ही कहाणी सुरू होते २००८मध्ये. त्यावेळी निमिषा फक्त १९ वर्षांची होती आणि नोकरीच्या शोधात होती. कोणीतरी तिला सांगितलं, तू येमेनला जा, तिथे नोकरीच्या भरपूर संधी आहेत आणि पगारही चांगला मिळेल. इतर अनेक तरुण-तरुणींप्रमाणे तिनंही येमेनचा रस्ता धरला. येमेनची राजधानी सना येथे एका सरकारी रुग्णालयात तिला नर्सची नोकरीही मिळाली. लग्नाच्या निमित्त निमिषा २०११मध्ये पुन्हा भारतात आली. कोच्ची येथे राहणाऱ्या टॉमी थॉमसशी तिनं लग्न केलं आणि त्यानंतर ते दोघंही परत येमेनला आले. पगार अतिशय कमी होता; पण थाॅमसला तिथे इलेक्ट्रिशियन असिस्टंटची नोकरी मिळाली.
२०१२मध्ये त्यांनी मिशाल या मुलीला जन्म दिला. पण, कमी पगार आणि ओढग्रस्तीमुळे त्यांचं तिथे भागेना. विचारांती २०१४मध्ये थॉमस मुलीसह पुन्हा भारतात परतला. निमिषानं येमेनमध्येच एक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यासाठी तिथल्या नियमानुसार स्थानिक पार्टनरची गरज होती. याच दरम्यान निमिषाची तलाल अब्दो महदी याच्याशी ओळख झाली. २०१५ मध्ये निमिषा पती आणि मुलीला भेटण्यासाठी भारतात आली. या भेटीत तलालही तिच्या सोबत आला. यावेळी तलालनं या दोघांच्या लग्नाचा एक फोटो त्यांच्या घरातून चोरला.
निमिषानं कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून मोठ्या मुश्किलीनं सुमारे ५० लाख रुपये गोळा केले आणि येमेनमध्ये क्लिनिक सुरू केलं. पती आणि मुलीला पुन्हा येमेनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं. ‘ऑपरेशन राहत’अंतर्गत भारत सरकारनं पाच हजार भारतीयांना परत मायदेशी आणलं; पण निमिषा येऊ शकली नाही, कारण तलालनं तिला अडवलं होतं. तिचा पासपोर्टही त्यानं आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानं तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू केला. त्याविरुद्ध तिनं पोलिसांत तक्रारही दिली; पण पोलिसांनी उलट तिलाच सहा दिवस कोठडीत डांबलं. कारण निमिषा आणि टॉमी यांच्या लग्नाच्या फोटोत फेरफार करून आपणच निमिषाचा पती असल्याचं त्यानं पोलिसांना भासवलं.
भारतातही जाता येत नाही आणि तलालकडून हाेणारा छळही थांबत नाही म्हणून आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी एक दिवस निमिषानं तलालला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं. त्या इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे तलालचा मृत्यू झाला. खुनाच्या आरोपावरून निमिषाला फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. ‘ब्लड मनी’ म्हणजे ज्याचा खून झाला आहे, त्याच्या परिवाराला पैसे देऊन फाशी रद्द होऊ शकते. निमिषाच्या माफीसाठी केरळच्या एका दानशूर उद्योजकानं त्यासाठी एक कोटी रुपयेही देऊ केले आहेत; पण अद्याप त्याला तलालच्या कुटुंबीयांनी संमती दिलेली नाही. निमिषाला वाचवण्यासाठी आणि त्यात केंद्र सरकारनं राजनैतिक हस्तक्षेप करण्यासाठी भारतात सुप्रीम कोर्टातही एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेवर १४ जुलैला म्हणजे तिच्या फाशीच्या दोन दिवस आधी सुनावणी घेण्यास सहमती दाखवली आहे.