Barack Obama Michelle Obama divorce : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या नात्यात ३३ वर्षांनंतर दुरावा आल्याच्या चर्चा आहेत. हे दोघे विभक्त होणार असून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. अमेरिकन माध्यमांमधील अनेक वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे दोघेही एकमेकांपासून दूर राहत आहेत. तशातच मिशेल ओबामा यांनी सांगितले आहे की ती तिचे अंतिम उत्तर पॉडकास्टद्वारे देईल. मिशेल ओबामा हिने तिचा भाऊ क्रेग रॉबिन्सनसोबत एक पॉडकास्ट शूट केले आहे. मिशेलने हे सोशल मीडियावर शेअर केले आहे. मिशेल म्हणते की मी या पॉडकास्टमध्ये माझ्या आयुष्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. मिशेलच्या या विधानानंतर, घटस्फोटाबाबत ती काही मोठा खुलासा करू शकते असे मानले जात आहे.
'फायनल' उत्तरापूर्वी सूचक विधान
घटस्फोटावर मिशेल काय बोलणार, याबाबत पॉडकास्टमध्ये केलेल्या सूचक विधानांमुळे विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. मिशेलने टीझरमध्ये म्हटले आहे की, माझा भाऊ क्रेग आणि मी आमच्या आयुष्यातील आव्हानांबद्दलच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे एकत्र देऊ, कारण खरे सांगायचे तर आपण काही अतिशय गुंतागुंतीच्या आणि गोंधळात टाकणाऱ्या काळातून जात आहोत. सध्याच्या काळात आपण पूर्वीपेक्षा जास्त एकटेपणा अनुभवत आहोत. मिशेलने हे विधान सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी केले असले तरीही लोक याचा संबंध त्यांच्या घटस्फोटाशी लावत आहेत.
पॉडकास्टमध्ये मोठ्या लोकांची मुलाखत
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, मिशेल तिच्या भावासोबत दर आठवड्याला एक पॉडकास्ट करणार आहे. मिशेल या पॉडकास्टवर वृद्ध लोकांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करेल. मिशेलने यासाठी बुधवार निवडला आहे. मिशेल ओबामाचा भाऊ क्रेग हा ब्रॉडकास्टर आहे. तो यापूर्वी बास्केटबॉल प्रशिक्षक होता. क्रेगने प्रिन्सटन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
दरम्यान, मिशेल ओबामाने १९९२ मध्ये बराक ओबामा यांच्याशी लग्न केले. त्यावेळी मिशेल २८ वर्षांची होती. प्रिन्सटनमध्ये सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मिशेल हार्वर्डला गेली. मिशेल आणि बराक यांना मारिया आणि साशा अशा दोन मुली आहेत. बराक ओबामा २००९ ते २०१७ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. २०२० आणि २०२४ च्या अमेरिकन निवडणुकीत मिशेल राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार होण्याचीही जोरदार चर्चा रंगली होती.