अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू करत भारतासह अनेक देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आता भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवू शकतो या वृत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हसून स्वागत केले आहे. त्यांनी हे भारताचे एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. मॉस्कोशी ऊर्जा संबंध राखणाऱ्या देशांवर अमेरिकेच्या वाढत्या दबावादरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, ट्रम्प यांनी हा दावा खरा आहे की नाही, याबाबत आपल्याला खात्री नसल्याचेही स्पष्ट केले.
संभाव्य दंड किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याबद्दल विचारले असता, ट्रम्प म्हणाले की, "मला असे समजले आहे की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मी हे ऐकले आहे, मात्र ते खरे आहे की नाही हे मला माहीत नाही. पण हे एक चांगले पाऊल आहे. पुढे काय होते ते पाहू."
रशियन तेलाच्या खरेदीवर दबावयुक्रेन युद्धामुळे अमेरिकेने रशियाच्या उत्पन्नाचे स्रोत थांबवण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे, रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा दबाव वाढत आहे. २०२२ मध्ये मॉस्कोवरील पाश्चात्त्य निर्बंध शिथिल झाल्यानंतर, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयातदार असलेल्या भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्यास सुरुवात केली होती.
रशियन तेलाच्या खरेदीवर तात्पुरती बंदीनुकत्याच आलेल्या काही माध्यमांमधील वृत्तानुसार, सवलती कमी झाल्यामुळे आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे भारतातील सरकारी रिफायनरीजनी रशियन तेल खरेदी तात्पुरती थांबवली आहे. मात्र, भारत सरकारने या निर्णयाला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. ट्रम्प यांचे हे विधान त्यांनी भारतावर टीका केल्यानंतर एका आठवड्यानंतर आले आहे. त्यांनी 'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये रशियन ऊर्जा आणि लष्करी उपकरणे खरेदी सुरू ठेवल्याबद्दल आणि त्याचवेळी अमेरिकेसोबत व्यापार अडथळे कायम ठेवल्याबद्दल भारतावर टीका केली होती.
२५ टक्के कर लावण्याची घोषणाअलीकडेच व्हाईट हाऊसने अमेरिकेतून होणाऱ्या सर्व भारतीय निर्यातीवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे, तसेच रशियासोबतच्या ऊर्जा व्यापारासाठी दंडही आकारला जाईल असे सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी रशियासोबतच्या भारताच्या दीर्घकालीन संबंधांचे समर्थन केले. भारत आणि रशिया यांच्यात स्थिर आणि जुनी भागीदारी आहे असे ते म्हणाले. जयस्वाल यांनी भारत-अमेरिका संबंधांची मजबूती अधोरेखित केली आणि ते सामायिक हितसंबंध, लोकशाही मूल्ये आणि मजबूत लोक-ते-लोक संबंधांवर आधारित असल्याचे सांगितले. सध्याच्या तणावामुळेही द्विपक्षीय संबंध वाढतच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.