जागतिक राजकारणातील सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना असलेल्या 'नाटो'च्या रचनेत आता आमूलाग्र बदल होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोमधील अमेरिकेची जबाबदारी कमी करण्याचा आणि युरोपीय देशांवर संरक्षणाचा आर्थिक भार टाकण्याचा आपला प्लॅन प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. या नव्या रचनेनुसार, आता इटली आणि ब्रिटनकडे नाटोची महत्त्वाची सूत्रे सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ट्रम्प यांची नवी रणनीती
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' या धोरणांतर्गत नाटोमधील अमेरिकेचा आर्थिक आणि लष्करी हस्तक्षेप कमी करण्याचे संकेत दिले होते. अमेरिकेला आता आपला संपूर्ण रोख चीनकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांकडे वळवायचा आहे. त्यामुळे युरोपच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतः युरोपीय देशांनीच उचलावी, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून अमेरिकेने नाटोच्या महत्त्वाच्या कमांड्स मित्रराष्ट्रांकडे सोपवण्याचा तत्वतः निर्णय घेतला आहे.
इटली आणि ब्रिटनला मिळणार मोठी ताकद
राजनयिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटोच्या कमांड स्ट्रक्चरमध्ये काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. यात दक्षिण युरोपमधील घडामोडींवर लक्ष ठेवणारी नाटोची 'नेपल्स कमांड' आता इटलीकडे सोपवली जाणार आहे. तर, उत्तर युरोपच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी ब्रिटनला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युनायटेड किंगडममधील सागरी कमान मात्र अमेरिका स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे.
युरोपीय देशांमध्ये चिंतेचे वातावरण
एकूण ३२ सदस्य असलेल्या नाटोमध्ये अमेरिकेची भूमिका केंद्रस्थानी राहणार असली, तरी जबाबदाऱ्यांच्या वाटपामुळे युरोपीय देशांवरील लष्करी खर्चाचा ताण वाढणार आहे. युक्रेन-रशिया युद्धानंतर अनेक युरोपीय देशांनी आधीच आपले संरक्षण बजेट वाढवले आहे. त्यातच ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याबाबत व्यक्त केलेल्या महत्त्वाकांक्षेमुळे युरोपीय देशांमध्ये आधीच नाराजी आणि आश्चर्याचे वातावरण आहे.
"नाटो संपवण्याचा विचार नाही" - अमेरिका
दरम्यान, नाटोमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटेकर यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका नाटो मजबूत करू इच्छिते, संपवू इच्छित नाही. जबाबदाऱ्यांचे वाटप म्हणजे नाटोला अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न आहे. हे बदल पूर्णपणे लागू होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे एका फ्रेंच मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
Web Summary : Trump's plan to reduce US role in NATO shifts power to Italy and UK. US prioritizes China challenge, urging Europe to self-fund defense. Despite concerns, US aims to strengthen, not dismantle, NATO through shared responsibilities.
Web Summary : ट्रम्प की नाटो में अमेरिकी भूमिका को कम करने की योजना से इटली और यूके को शक्ति मिलती है। अमेरिका चीन की चुनौती को प्राथमिकता देता है, यूरोप से आत्म-रक्षा का आग्रह करता है। चिंताओं के बावजूद, अमेरिका का लक्ष्य साझा जिम्मेदारियों के माध्यम से नाटो को मजबूत करना है, न कि उसे खत्म करना।