पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यावेळी संरक्षण दलांसाठी महत्वाच्या डील करण्याची शक्यता आहे. याचबरोबर तेजस विमानांच्या इंजिनांना लागलेला विलंब यावरही नाराजी व्यक्त करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या होऊ घातलेल्या डीलमुळे पाकिस्तान आणि चीनला धक्का बसण्याची शक्यता आहे.
भारत आणि अमेरिकेत स्ट्रायकर कॉम्बॅट व्हेईकल आणि फायटर जेट इंजिनच्या सह-निर्मितीबाबत मोठा करार होऊ शकतो. याचबरोबर माउंटेड अँटी-टँक गाईडेड मिसाइल सिस्टीम देखील खरेदी करण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराने उंचावर असलेल्या भागात स्ट्रायकर व्हेईकलची चाचणी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
नुकताच हवाई दल प्रमुखांनी हिंदुस्तान एअरोनॉटीक्सवर नाराजी व्यक्त केली होती. विमानांचे इंजिनच नाही तर विमानांची बांधणी देखील अपूर्ण आहे. एकही विमान तयार झालेले नाही. हल मिशन मोडवर नसल्याचे ते म्हणाले होते. मुळात अमेरिकेने भारताला तेजस विमानांचे इंजिन दिलेले नाही. दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे अधिकारी लवकरच अमेरिकन अधिकाऱ्यांशी आणि जनरल इलेक्ट्रिकच्या एरोस्पेस युनिटला भेट देणार असल्याचे सांगितले जात आहे.
या बैठकीत मार्चपर्यंत GE-414 इंजिनची निर्मिती प्रक्रिया अंतिम करण्याबाबत चर्चा होईल. याचबरोबर भारत अमेरिकेच्या टेरिफच्या मागणीवरही चर्चा करू शकतो. टेरिफ वॉरचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढण्याचा देखील मोदींच्या भेटीत प्रयत्न होऊ शकतो. याचबरोबर भारतीय अवैध प्रवासी परत पाठविण्यावर देखील मार्ग निघू शकतो. तसेच अमेरिकेच्या व्हिसा देण्याच्या विलंबावरही चर्चा होऊ शकते. या व्हिसा विलंबावर परराष्ट्र मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती.