जपानला का हवाय ‘लोनलीनेस मिनिस्टर’?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:41 AM2021-03-01T05:41:02+5:302021-03-01T05:41:09+5:30

जपानी एकटेपणाचा रंग जगापेक्षा काहीसा भिन्न आहे. जपानी स्त्रियांमध्ये विवाहाचं प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे त्यांना आपापल्या पायावर उभं राहाण्याचा झगडा एकेकटीने करावा लागतो. त्यात लॉकडाऊनमुळे नोकरीचे प्रश्न गंभीर झाले आहेत.

Why does Japan want a 'loneliness minister'? | जपानला का हवाय ‘लोनलीनेस मिनिस्टर’?

जपानला का हवाय ‘लोनलीनेस मिनिस्टर’?

googlenewsNext

मिनिस्टर फॉर लोनलीनेस. ‘एकाकीपणाच्या’ खात्याचा मंत्री, असं कुठं मंत्रालय असतं का? आपल्याकडे तर अनेकांना हे बिनकामाचं मंत्रालय वाटू शकतं. लोकांना कोरोना महामारीच्या काळात एकटेपणा आला, एकाकी वाटू लागलं, ते एकटेपणानं कुढायला लागले तर त्याला सरकार काय करणार, आता सरकारने राज्यकारभार हाकायचा की लोकांशी गप्पा मारायला घरोघर मंत्री पाठवायचे असंही कुणाला वाटू शकतं. सरकारने काय काय करायचं असं म्हणत जबाबदारी झटकणं तर सहज शक्य आहे. मात्र जपान सरकारने असं केलेलं नाही.  महामारीने माणसांच्या आयुष्यात जो एकटेपणा आणला आणि त्यातून जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यासाठी जपान सरकारने खास मंत्रालय तयार केलं आहे. या मंत्रालयाला कॅबिनेट दर्जाचा मंत्रीही असेल. जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. तेतसुशी साकामोटो यांची एकाकीपणा खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.


जपानला अचानक  अशी गरज का वाटली असावी?  महामारीने जगभरातल्या माणसांनाच एकेकटं करत ‘आयसोलेट’ केलंय, तर मग जपानी माणसांनाच असं कोणतं जगावेगळं एकटेपण छळतं आहे? त्याचं उत्तर जपानचे पंतप्रधान सुगा देतात. ते म्हणतात, ‘जपानी माणसांमध्ये विशेषत: महिलांमध्ये एकटेपणाचे प्रश्न बरेच गंभीर झालेले आहेत. त्यांच्यात आत्महत्या करण्याचा सरासरी दरही वाढलेला आहे. त्यामुळे मंत्री साकामोटो यांनी या साऱ्या स्थितीचा अभ्यास करुन, सर्व सरकारी यंत्रणा, योजना, नागरिक, यांच्यात समन्वय तयार करुन या प्रश्नावर धोरण तयार करावं अशी माझी अपेक्षा आहे.’


जपानी एकटेपणाचा रंग जगापेक्षा काहीसा भिन्न आहे. जपानी स्त्रियांमध्ये विवाहाचं प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे त्यांना आपापल्या पायावर उभं राहाण्याचा झगडा एकेकटीने करावा लागतो. त्यात लॉकडाऊनमुळे नोकरीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. एका विचित्र अस्वस्थता सर्वांनाच  त्रास देते आहे. तेतसुशी साकामोटो म्हणतात, ‘ एकटेपणा कमी करण्यासाठी काही थेट कृती कार्यक्रम आखणं, उर्जस्वल वातावरण निर्माण करणं, घसरत्या जन्मदरा संदर्भात जनजागृती करणं यासाठीही आम्ही काम करणार आहोत.’ जपानच्या आरोग्य मंत्रालयाशी समन्वय साधत आत्महत्या प्रतिबंधक उपाय करणं, कृषी मंत्रालयाशी समन्वय साधत फूड बँक तयार करणं असंही काम जपान सरकारने हाती घेतलं आहे. लोकांना अन्नच मिळत नाही, उपासमारीने आत्महत्येपर्यंतची टोकं गाठली जातात म्हणून खाद्यपदार्थांच्या मोफत बँक तयार करणंही आता सरकारी प्राथमिकतेवर आलं आहे. एकीकडे जपानी लोकसंख्या वृद्ध होत चालली आहे. वृद्धांच्या एकटेपणाचा प्रश्न आधीपासूनच होता, महामारीने तो अधिक गंभीर केला. जपानमध्ये सर्वच वयोगटात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एकाकीपणाचे प्रश्न गंभीर आहेतच, मात्र आता महिला आणि वृद्ध अधिक एकाकी झालेले आहेत असं जपानी मंत्रालयाचा अभ्यास सांगतो. 
नैसर्गिक किंवा अन्य संकटात माणसांना उदास, एकेकटं वाटतंच. १९९५ चा जपानमधला भूकंप, २०११ साली आलेली भयंकर त्सुनामी या काळातही अनेकांना एकटेपणाचा त्रास आला. त्याकाळात ज्यांची घरंदारं गेली त्यांना  निवारा केंद्रात रहावं लागलं. काही जणांचा त्यातच मृत्यू झाला, एकाकी. जवळच्या माणसांपासून दूर, एकेकटं आलेलं हे मरण, त्याला जपानीत कोडोकुशी म्हणतात, असे मृत्यू जपानमध्ये फार चिंतेचा विषय बनले होते. 


या साऱ्याहून जास्त कहर  कोरोना महामारीने केला. लोकांना घरात बसण्याची सक्तीच झाली. जे जगभर झालं तेच चित्र; पण माणसांचा चेहराही दिसत नाही, स्पर्श तर लांबच! ज्यांना ऑनलाइन कम्युनिकेशनचा सराव नाही ते महिनोंमहिने घरात डांबलेले, परावलंबी. त्यांचे भयंकर हाल झाले. त्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक तंगीनं घेरलं. जपान सरकारची आकडेवारी सांगते की २००९ नंतर, म्हणजे आर्थिक मंदीच्या संकटानंतर जपानमध्ये आत्महत्यांचं प्रमाण या कोरोना काळातच प्रचंड वाढलं आहे. २०२० या वर्षात ९१९ आत्महत्या झाल्या. २००९ नंतर आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं होतं, ते सलग ११ वर्षे कमी होतं. पण कोरोना काळात ते  वाढलं.  दर लाख लोकांमागे १४.९ आत्महत्या होतात. आरोग्याचे प्रश्न आणि आर्थिक तंगी ही  आत्महत्यांची मुख्य कारणं. महामारीने या कारणांची तीव्रता वाढवली. ज्यांनी आत्महत्या केलेली नाही पण जे भयंकर एकेकटे, उदास, आपापल्या घरात अलिप्त होऊन भकास जगताहेत, त्यांचं काय करायचं असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जपानी सरकारला अजूनही या प्रश्नांवर ठोस उत्तर सापडलेलं नाही. 

इंग्लंडचे एकाकी मंत्री
एकाकीपणा-लोनलीनेस हा आपल्या नागरिकांमधला गंभीर प्रश्न आहे हे इंग्लंडने २०१८ मध्ये सर्वप्रथम मान्य केलं. २०१७ मध्ये जो कॉक्स कमिशन ऑफ लोनलीनेस या अभ्यासानुसार इंग्लंडमध्ये ९० लाख लोक एकाकीपणाच्या अस्वस्थतेनं त्रस्त आहेत अशी आकडेवारी पुढे आली होती. त्यानंतर लोनलीनेस मिनिस्टर म्हणून ट्रेसी कोच यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Why does Japan want a 'loneliness minister'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Japanजपान