President of Russia Vladimir Putin successor : व्लादिमीर पुतिन यांना पुढील अनेक वर्षे रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहायचे आहे, हे त्यांनी अनेकदा त्यांच्या वर्तणुकीतून सांगितले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार मंडळीही यास दुजोरा देताना दिसतात. पण याचदरम्यान, व्लादिमीर पुतिन यांनी देशाचे पुढील राजकीय नेतृत्व कोणाच्या हाती जाईल हे स्पष्ट केले आहे. थोडक्यात म्हणजे, व्लादिमीर पुतिन यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल, याबद्दल त्यांनी विधान केले आहे.
पुतिनचा वारसदार कोण?
रशियन संसदेत (ड्यूमा) विविध पक्षांच्या नेत्यांशी बोलताना पुतिन म्हणाले की, देशासाठी ज्यांनी आपले प्राण धोक्यात घातले आहेत त्यांना राजकारणात आणि सत्तेत स्थान मिळाले पाहिजे. हे योद्धेच रशियाच्या भविष्याची जबाबदारी घेतील आणि सत्तेचे वारसदार बनतील. पुतिन यांच्या या विधानामुळे रशियातील राष्ट्रवादाचे वर्चस्व अधिक प्रखरपणे दिसून येणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.
राष्ट्रवाद आणखी कट्टर होणार...
रशियात विरोधी पक्षांचा आवाज आधीच रशियन राजकारणातून जवळजवळ संपुष्टात आला आहे. पुतिन यांचा निष्ठावंत युनायटेड रशिया पक्ष राजकारणात वर्चस्व गाजवतो आहे. त्यांच्या ताज्या विधानावरून हे स्पष्ट होते की रशिया भविष्यातही आणखी राष्ट्रवादी आणि कट्टर भूमिका स्वीकारेल. त्यामुळे पुतिन यांच्या मृत्यूनंतरही याच पद्धतीची विचारसरणी रशियन राजकारणावर प्रभाव पाडेल आणि राज्य करेल.
१ लाख ३० हजार सैनिकांचा मृत्यू
दरम्यान, रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून लाखो सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले आहे. अगदी कैद्यांनाही तुरुंगातून सोडण्यात आले आहे आणि त्यांना लढण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. रशिया अधिकृत आकडेवारी जाहीर करत नाही, परंतु बीबीसी आणि स्वतंत्र माध्यमांनुसार, आतापर्यंत किमान १,३०,००० रशियन सैनिक मारले गेले आहेत. तसेच युद्धभूमीहून परतणाऱ्यांपैकी बरेच जण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालेले आहेत.