अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉलचा वापर करू नये असं म्हटलं होतं. ज्यावर आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रतिक्रिया दिली आहे. गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल गोळी घेतल्याने मुलांमध्ये ऑटिझ्म आणि ADHD (अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) चा धोका वाढू शकतो असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
WHO ने आता ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल मुलांमध्ये ऑटिझ्मचा धोका वाढवते याचा कोणताही पुरावा नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल सुरक्षित मानली जाते असं WHO ने म्हटलं आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, WHO चे प्रवक्ते तारिक जासारेविक यांनी जिनेव्हा येथे सांगितलं की, "लसीकरणामुळे ऑटिझ्म होत नाही, तर त्यामुळे जीव वाचवले जातात. ही अशी गोष्ट आहे जे विज्ञानाने सिद्ध केली आहे. या गोष्टींवर खरोखर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ नये." तसेत युरोपियन मेडिसिन एजन्सीने ट्रम्प यांच्या दाव्यांना समर्थन देणारा कोणताही पुरावा नाही असं म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) गर्भवती महिलांसाठी असलेल्या एसिटामिनोफेन लेबलवर एक इशारा देईल, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान त्याचा वापर करण्याविरुद्ध सावधगिरी बाळगली जाईल. त्यांनी गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल वापरणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.
एफडीएने अद्याप पॅरासिटामॉलमुळे ऑटिझ्म होतो असा इशारा दिलेला नाही. ट्रम्प यांच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत असे एफडीएने स्पष्ट केलं आहे. ट्रम्प यांनी ऑटिझ्म बरा करू शकणारे "चमत्कारिक औषध" शोधल्याचा दावाही केला आहे. हे अभियान अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.