PM Modi and Donald Trump Meeting: अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिकेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही देशातील व्यापार अधिक वाढवण्यावरही चर्चेत जोर देण्यात आला. पण, ट्रम्प यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी काही शब्द उच्चारले, त्याची चर्चा होत आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात...
मोदींच्या MIGA + MAGA = MEGA चा अर्थ काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, "मेक अमेरिका ग्रेट अगेन (Make America Great Again -MAGA) बद्दल लोकांना माहिती आहे. भारतही २०४७ पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. हे अमेरिकेच्या भाषेत सांगायचं झालं, तर मेक इंडिया ग्रेट अगेन (Make India Great Again - MIGA). जेव्हा मिगा आणि मागा एकत्र येतात, तेव्हा समृद्धीसाठी मेगा पार्टनरशिप (MEGA) होते", असे मोदी म्हणाले.
२०३० पर्यंत व्यापार $500 बिलियनपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशातील व्यापार २०३० पर्यंत दुप्पट करून $500 बिलियन पर्यंत नेण्याचा मानस व्यक्त केला.
सध्या अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे आणि २०२४ मध्ये दोन्ही देशातील व्यापार $१२९.२ बिलियन इतका आहे.
व्यापाराशिवाय भारत आणि अमेरिकेने ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावरही जोर दिला. मोदी म्हणाले, भारत तेल आणि गॅस व्यापार वाढवण्यासाठी, रिन्यूएबल ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आणि अणु ऊर्जेमध्ये सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत कायद्यात बदल करत आहे, जेणे करून अमेरिकेच्या अत्याधुनिक आण्विक तंत्रज्ञान तिथे नेता येईल. ज्यामुळे लाखो लोकांना स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा मिळेल.