थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर युद्धाला सुरुवात झाली आहे. रॉयल थाई आर्मीने कंबोडियाने वादग्रस्त सीमेच्या ईशान्येकडील भागाजवळील लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. त्याला प्रत्यूत्तर म्हणून कंबोडियाने एअर डिफेन्स सिस्टीम सुरु केली आहे. यात दोन विमाने पाडली गेल्याचे सांगितले जात आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर आशियात सुरु झालेले हे दुसरे युद्ध आहे. थायलंडने गुरुवारी कंबोडियाच्या सीमेवर F-16 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. मिसाईल हल्ले आणि हवाई हल्ले केले जात आहेत.
बँकॉक पोस्टच्या वृत्तानुसार गुरुवारी सकाळपर्यंत थायलंडच्या सीमेवर सहा ठिकाणी कंबोडियाशी चकमक झाली आहे. सहा एफ-१६ विमानांपैकी एकाने कंबोडियात घुसून हल्ला चढविला आहे. यात एक लष्करी लक्ष्य उद्ध्वस्त करण्यात आल्याचे थाई सैन्याने म्हटले आहे. तसेच हल्ले करून आपली सर्व विमाने परत बेसवर पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे.
कंबोडियन सैनिकांनी सुरिनमधील थाई लष्करी तळावर गोळीबार केला आणि सिसाकेटच्या दिशेने अनेक रॉकेट हल्ले केल्याचा दावाही थायलंडच्या सैन्याने केला आहे. मे महिन्याच्या अखेरीस दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढण्यास सुरुवात झाली होती. गोळीबारात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्ही बाजूंनी सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यात आली होती. तसेच व्यापाराचे मार्गही बंद करण्यात आले आहेत.