आपल्याकडे एक आलिशान चार चाकी असावी, तिच्यामधीन आपल्याला मनसोक्त फिरता यावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. अशी कार खरेदी करण्यासाठी लोक पै पै जमवून आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यासाठी काही वर्षे वाटही पाहतात. अशीच आपली स्वप्नातील कार खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहून ती खरेदी केल्यावर अगदी तासाभरात ही स्वप्नातील कार जळून खाक झाल्याचा दुर्दैवी प्रकार एका तरुणासोबत घडला आहे.
जपानमधील एका संगीतकाराने भरभक्कम किंमत मोजून फेरारी ४५८ स्पायडर ही आलिशान कार खरेदी केली होती. मात्र शोरूममधून ही कार घेऊन रस्त्यावर उतरताच काही तासांमध्येच ती जळून खाक झाली. टोकियोमध्ये राहणारा ३३ वर्षीय संगीतकार होनकॉन याने हल्लीच फेरारी ४५८ स्पायडर स्पोर्ट्स कार खरेदी केली होती. मात्र शोरूममधून डिलिव्हरी मिळाल्यानंतर काही तासांतच ती जळून खाक झाली. या घटनेमुळे या आलिशान कारच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
दरम्यान, आता ही आग कशी लागली, याचा तपास केला जात आहेत. मात्र या घटनेमुळे या कारचा मालक असलेल्या होनकॉन याला मोठा धक्का बसला आहे. भारतीय चलनानुसार त्याने सुमारे २.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजून त्याने ही कार खरेदी केली होती. तसेच ही कार खरेदी करण्यासाठी त्याने तब्बल १० वर्षे वाट पाहिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार १६ एप्रिल रोजी होनकॉन याला त्याच्या कारची डिलिव्हरी मिळाली होती. तो आपल्या कारची डीलरशिप घेऊन टोकियोमधील मिटानो परिसरातून जात असताना त्याच्या कारमध्ये काहीतरी गडबड झाली. कारच्या मागच्या भागातून धूर येताना दिसला. कारमध्ये काही तरी तांत्रिक बिघाड झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तातडीने कार थांबवली आणि तो खाली उतरला. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांत कार जळून खाक झाली.