पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:06 PM2018-07-22T23:06:57+5:302018-07-22T23:07:21+5:30

उमेदवार गंभीर जखमी; वाहनचालक, सुरक्षारक्षकासह दोन ठार

Violence in the face of elections in Pakistan | पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २५ जुलैैला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील वातावरण तापू लागले असून हिंसाचाराच्या घटनाही वाढत आहेत. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चा उमेदवार अतिरेक्यांनी रविवारी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याचे अंगरक्षक व वाहनचालक असे दोघे जण ठार झाले आहेत. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानातील उमेदवारांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे.
खैैबर पख्तुनवा येथील डेरा इस्माइल खान या भागात पीटीआयचे उमेदवार इक्रमुल्ला गंडपूर हे पीके-९९ या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचारासाठी जाताना त्यांच्या वाहनावर आत्मघाती हल्ला केला गेला. त्यात इक्रमुल्ला गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खैैबर पख्तुनवा प्रांताचे ते माजी कृषीमंत्री आहेत. इक्रमुल्ला यांचे भाऊ व माजी कायदामंत्री इसरुल्ला गंडपूर हे दहशतवाद्यांच्या हल्ल्यातच ठार झाले होते. त्यानंतर पीके-६७ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत इक्रमुल्ला निवडून आले होते.
बन्नू जिल्ह्यातही जमियत-उलेमा-इस्लाम-फज्ल (जेयूआय-एफ)चे नेते अक्रम खान दुर्रानी हे मात्र त्यांच्या वाहनावर दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारातून सुदैैवाने बचावले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या विरोधात अक्रम खान दुर्रानी मुत्तहिदा मजलिस-ए-अमल या पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. गेल्या काही दिवसांत दुर्रानी यांच्यावर झालेला हा दुसरा हल्ला असून बन्नू जिल्ह्यात आतापर्यंत उमेदवारांवर तीन हल्ले झाले आहेत.
आयएसआयविरोधात निदर्शने
नवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी रावळपिंडी येथील आयएसआयच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. ‘यह जो दहशद गर्दी हैै, उसके पिछे वर्दी हैै अशा आयएसआयच्या निषेध करणाºया घोषणा ते देत होते. त्यांनी आयएसआय मुर्दाबादच्या घोषणांनीही परिसर दणाणून सोडला होता. या पक्षाचे नेते हनीफ अब्बासी यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने हे कार्यकर्ते संतप्त झाले होते. पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत आयएसआयने गडबड, गोंधळ चालविली असल्याचा आरोपही या शरीफ समर्थक निदर्शकांनी केला. (वृत्तसंस्था)

लष्कर-न्यायसंस्थेत जुंपली
सर्वोच्च न्यायालयास चौकशीची विनंती
इस्लामाबाद: भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कैदेत असलेले माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांना येत्या २५ जुलैची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत काहीही केल्या तुरुंगाबाहेर येता येऊ नये यासाठी पाकिस्तान लष्कराची ‘आयएसआय’ ही गुप्तचर संस्था न्यायसंस्थेवर दबाव आणत आहे, असा जाहीर आरोप इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने केल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर आणि न्यायसंस्था यांच्यात रविवारी उघड संघर्षाची स्थिती समोर आली.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. शौकत अझीझ सिद्दिकी यांनी वकील संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलताना असा आरोप केला की, ‘आयएसआय’चे लोक न्यायालयीन प्रकरणांमध्ये लुडबूड करतात व ठराविक प्रकरणांमध्ये आपल्याला हवे तसे निकाल लागावेत यासाठी पसंतीच्या न्यायाधीशांची खंडपीठांवर नेमणूक करून घेतात. नवाज शरीफ व त्यांची मुलगी मरियम यांनी भ्रष्टाचार खटल्यातील शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलातही हेच घडत आहे व शरीफ निवडणूक होईपर्यंत तुरुंगाबाहेर येऊ नयेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
‘आयएसआय’चा एक अधिकारी ‘तुम्हाला मुख्य न्यायाधीश करतो’, अशी ‘आॅफर’ घेऊन आपल्याकडे आला होता, असेही न्या. सिद्किी म्हणाले होते. याच सिद्दिकी यांनी लष्कर व ‘आयएसआय’ यांनी राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करावे व सरकारच्या अन्य विभागांच्या कामांत नस्ती लुडबूड करू नये, असा लेखी आदेशही गेल्या आठवड्यात एका प्रकरणात दिला होता.

या पार्श्वभूमीवर लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटले की, जबाबदार पदावर असलेल्या न्यायाधीशांनी केलेल्या या गंभीर आरोपांची चौकशी करून लष्कर व न्यायसंस्था यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी तत्परतेने योग्यती कारवाई केली जावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास लष्कराने केली आहे.दरम्यान, पाकिस्तानचे सरन्यायाधीश न्या. साकिब निसार यांनीही न्या. सिद्दिकी यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल घऊन त्यांच्या या जाहीर भाषणाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करणयाचे निर्देश देशाच्या इलेक्ट्रॉनिक माध्यम नियामक प्राधिकरणास दिले आहेत.

Web Title: Violence in the face of elections in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.