मुंबई - महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी वादावरून चांगलेच रान पेटले आहे. त्यातच एका मराठमोळ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मूळच्या वर्धा येथील आणि सध्या साताऱ्यात वास्तव्य असणाऱ्या डॉ. वर्षा देशपांडे यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर येथे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.
वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्या सोहळ्यात चक्क मराठी भाषेतून त्यांनी जगाशी संवाद साधला. सुरुवातीला सन्माननीय व्यासपीठ, मंचावरील उपस्थित मान्यवरांचे नाव घेत त्या पुढे म्हणाल्या की, मी इंग्रजीतून बोलू शकते, परंतु महिला म्हणून मी या क्षेत्रात वावरताना माझी मातृभाषा मराठी आहे. या भाषेचा आदर या व्यासपाठीवर व्हावा त्यामुळे मी माझ्या मातृभाषेत बोलत आहे. हा सन्मान संपूर्ण जगभरातील, भारतातील, महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांसाठी, लोकांच्या सोबत राहून लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संस्था, संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हा सन्मान होतोय अशी माझी धारणा आहे. संयुक्त राष्ट्रांनी जपलेल्या मुल्याचे आणि तत्वाचे, मानवी प्रतिष्ठा, उपेक्षित आणि असुरक्षित लोकांच्या हक्कांसाठी मी त्यांच्यासोबत राहण्याची ग्वाही देते असं त्यांनी म्हटलं.
इतकेच नाही तर आपण सर्व जण मिळून आजचा वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेट करत असताना भविष्य काळातील जग हे मानवाधिकाराचे रक्षण करणारे, स्त्री-पुरुष समतेचा अंगिकार करणारे, अहिंसेने आणि शांततेने सगळ्यांना जीवनाचा अनुभव घेता येईल असं जग घडवण्याचा निर्धार आपण सगळेजण करतो. आपल्या भावी पिढीची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. आज त्या दिशेने पडलेले माझे महत्त्वाचे पाऊल आहे. हा पुरस्कार भविष्य काळात मला ऊर्जा देईल. समस्त भारतीयांच्या वतीने, जगभरात लोकांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी नम्रतापूर्वक हा पुरस्कार स्वीकारते असं वर्षा देशपांडे यांनी पुरस्कार घेताना सांगितले.
कोण आहेत वर्षा देशपांडे?
वर्षा देशपांडे यांनी १९८८ मध्ये झोपडीतून सामाजिक कार्याला सुरुवात केली. १९९० मध्ये त्यांनी दलित महिला विकास मंडळाची स्थापना केली. त्यांनी एचआयव्हीग्रस्त ट्रक चालक, क्लीनर, फिरता वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी प्रकल्प चालविले. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्टिंग ऑपरेशन करून जवळपास १८० डॉक्टरांवर कारवाई केली आहे. त्यांना आतापर्यंत २० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या ३५ वर्षांत भारतात लैंगिक समानतेसाठी काम केले. त्यांनी जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि समुदाय सहभाग या स्तरांवर काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’तर्फे त्यांना ११ जुलै रोजी न्यूयॉर्क येथे हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.