Charlie Kirk Murder Case: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि कंझर्वेटिव्ह यूथ ग्रुप टर्निंग पॉईंट यूएसएचे सीईओ आणि सहसंस्थापक चार्ली कर्क यांची गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना उटाह राज्यातील युटाह व्हॅली विद्यापीठात घडली. अमेरिकन तपासकर्त्यांनी शुक्रवारी चार्ली कर्क यांच्या हत्येतील संशयिताचे नवीन फोटो आणि व्हिडिओ फुटेज जारी केले आहेत. चार्ली कर्क यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली रायफल पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी एक फुटेज समोर आणलं असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोराला एका कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, गोळीबारानंतर संशयित छतावरून उडी मारून विद्यापीठातून पळून जातो असे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक माणूस विद्यापीठाच्या कॅम्पसच्या छतावर पायऱ्या चढताना, बंदूक चालवताना आणि नंतर पळून जाताना आणि छतावरून उडी मारताना दिसत आहे.
एफबीआयच्या म्हणण्यानुसार, छतावरून गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये गोळीबार करणाऱ्याच्या बुटाचे ठसे, तळहाताचे ठशांचा समावेश आहे. गोळीबारासाठी हल्लेखोराने वापरलेली बंदूक आणि गोळ्या विद्यापीठाजवळील भागातून जप्त करण्यात आली. याआधी एफबीआयने संशयिताचे अनेक फोटो जारी केले होते. हे फोटो सीसीटीव्ही फुटेजमधून घेतले आहेत. बेसबॉल कॅप आणि सनग्लासेस घातलेला एक तरुण एका इमारतीच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. संशयित हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वयाचा आहे. या व्यक्तीची माहिती देणाऱ्याला एफबीआयने १००,००० डॉलर पर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, बुधवारी युटा व्हॅली विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान ३१ वर्षीय कर्क हे प्रश्नांची उत्तरे देत होती. त्याचवेळी हल्लेखोराने त्यांच्या मानेवर गोळी झाडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. कर्क यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला.