Kim Jong-Putin Meeting: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर, किम जोंग यांच्या कर्मचाऱ्यांनी बैठकीच्या ठिकाणाहून डीएनएशी संबंधित सर्व पुरावे पुसून टाकले. किम जोंग यांनी स्पर्श केलेली खुर्ची आणि टेबल कर्मचाऱ्यांनी साफ केली. किम जोंग यांच्या या विचित्र कृतीमुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
किम जोंग यांच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल याबाबत एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात पुतिन आणि किम जोंग यांच्यातील बैठक संपताच, कर्मचाऱ्यांनी ती खुर्ची पुसण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर किम जोंग ज्या ग्लासमधू पाणी प्यायले, तो ग्लासही परत उत्तर कोरियाला नेण्यात आला.
किम जोंग यांच्या उपस्थितीत सर्व बोटांचे ठसे आणि पुरावे पुसून टाकण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व किम जोंग यांच्या उपस्थितीत झाले. हे काम फॉरेन्सिक तज्ञांनी केले. रशियन पत्रकार अलेक्झांडर युनाशेव यांनी त्यांच्या चॅनेलवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. युनाशेव यांनी म्हटले की, ही साफसफाई विचित्र वाटत असली तरी, दोन्ही नेत्यांची बैठक सकारात्मक वातावरणात संपली.
असे का केले?किमच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या इतक्या सावधगिरीमागील कारण स्पष्ट नाही, परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की, हे रशियन किंवा चिनी गुप्तचर संस्थांकडून डीएनए चोरीला जाण्याच्या भीतीमुळे असू शकते. विशेष म्हणजे, पुतिन स्वतः देखील अशीच खबरदारी घेतात. अहवालांनुसार, २०१७ पासून ते जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांचे अंगरक्षक त्यांची विष्ठा आणि मूत्र सीलबंद पिशव्यांमध्ये गोळा करुन परत आणतात. अलास्का येथे ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पुतिन यांच्या टीमनेही हाच प्रोटोकॉल फॉलो केला होता.