US tornado superhero baby: अमेरिकेतून एक धक्कादायक आणि आश्चर्यचकीत करणारी घटना समोर आली आहे. ही घटना एका चार महिन्यांच्या 'सुपरहिरो' बाळाची आहे. सुपरहिरो वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या बाळाने नेमकं काय केलंय? तर, या बाळासोबत जी घटना घडली, ती ऐकून तुम्हीही या बाळाची तुलना एखाद्या सुपरहिरोसोबत कराल. या घटनेची सुरुवात एका भयंकर चक्रीवादळाने होते....
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, आठवडाभरापूर्वीची घटना आहे. अमेरिकेतील टेनेसीमध्ये चक्रीवादळाचे सायरन वाजले, त्यामुळे लोक सुरक्षित ठिकाणी धावू लागले. येथील क्लार्क्सविले येथे राहणारी 22 वर्षीय सिडनी मूर नावाच्या महिलेच्या घराचे छत वादळामुळे उडाले, यामुळे घाबरलेल्या सिडनीने घाईघाईत आपला एक वर्षीय मुलगा प्रिन्स्टन, याला घेऊन घराबाहेर पळ काढला. यावेळी तिचा चार महिन्यांचा चिमुकला तिथेच पाळण्यात झोपला होता.
यानंतर तिचा 39 वर्षीय प्रियकर चिमुकल्या लॉर्डला आणण्यासाठी घरात परत गेला. यावेळी त्याला लॉर्ड पाळण्यात नसल्याचे दिसले. अचानक वादळ वाढले आणि अनेकांच्या घराचे छत, गाड्या हवेत उडू लागल्या. मुसळधार पावसाला सुरुवात झाली, यामुळे त्यांच्या घराच्या भिंतीही पडल्या. आपल्या लहान मुलाचा मृत्यू झाला, असे समजून ते तेथून सुरक्षित ठिकाणी गेले.
काही मनिटांनंतर त्यांना सुमारे 30 फूट अंतरावरील एका झाडावर त्यांचा चिमुकला अडकल्याचे दिसले. त्या महिलेने सांगितले की, हे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे होते. त्यांना वाटले होते की, आता त्यांचा मुलगा त्यांना कधीच सापडणार नाही. पण, देवाच्या कृपेने त्या चिमुकल्याचा जीव वाचला. तो जेव्हा सापडला, तेव्हा त्याचे कपडे फाटले होते, शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. अखेर त्या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केले, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.