नवी दिल्ली - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जाता जाता त्यांचा मुलगा हंटर बायडन यांना माफी दिली आहे. हंटर यांना २ गुन्हेगारी प्रकरणात शिक्षा सुनावली होती. हंटरला माफी देताना ज्यो बायडन यांनी त्याच्याविरोधातील गुन्हे राजकीय हेतूने प्रेरित होते असा तर्क दिला. बायडन यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेत फारसा गोंधळ झाला नाही परंतु हीच गोष्ट भारतात घडली असती तर कित्येक महिने त्यावर गदारोळ माजला असता. परंतु नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.
भारतातही राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार आहे. सर्वात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना मिळालेल्या शक्तीचा आढावा समजून घेऊ. अमेरिकेत दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी, मग ते डेमोक्रॅट असो किंवा रिपब्लिकन, आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना माफी देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी बऱ्याचदा माफी दिली आहे.
हंटर यांना कुठल्या प्रकरणात दिली माफी
हंटर बायडन हे दोन फेडरल फौजदारी खटल्यांचा सामना करत होते आणि त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. डेलावेअरमधील एका खटल्यात हँडगन खरेदी करताना ड्रग्जच्या वापराबाबत खोटी माहिती दिल्याच्या तिन्ही आरोपांवर त्यांना दोषी ठरवण्यात आले. हंटर यांना तिन्ही आरोपांमध्ये जास्तीत जास्त शिक्षा दिली असती तर त्याला २५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकली असती.
याव्यतिरिक्त हंटरवर २०१६ ते २०१९ दरम्यान कर चुकवेगिरीचे एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यात कर रिटर्न भरण्यात अयशस्वी होणे आणि खोटे रिटर्न दाखल करणे समाविष्ट आहे. कर प्रकरणात त्यांना जास्तीत जास्त १७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. अमेरिकेच्या इतिहासात विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलाला एखाद्या प्रकरणात दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ होती.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांकडे क्षमा करण्याची शक्ती काय आहे?
अमेरिकेच्या राज्यघटनेत राष्ट्रपतींच्या माफी शक्तीचा स्पष्टपणे उल्लेख नमूद केलेला आहे. कलम II च्या कलम २ मध्ये असे म्हटले आहे की महाभियोगाची प्रकरणे वगळता राष्ट्रपतींना शिक्षा कमी करण्याचा आणि युनायटेड स्टेट्सविरूद्धच्या गुन्ह्यांसाठी माफी देण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतींचा अधिकार फक्त संघीय गुन्ह्यांना लागू होतो, राज्यांना नाही. हे महाभियोग प्रकरणांना देखील लागू होत नाही. क्षमा ही एक व्यापक कार्यकारी आणि विवेकाधीन शक्ती आहे, याचा अर्थ राष्ट्रपती त्यांच्या माफीच्या अधिकारासाठी जबाबदार नाही आणि त्याच्या आदेशाची कारणे देण्यास बांधील नाही. मात्र, त्यालाही काही मर्यादा आहेत.
भारतातील राष्ट्रपतींना क्षमा करण्याची शक्ती काय आहे?
घटनेच्या कलम 72 नुसार, भारताच्या राष्ट्रपतींना या प्रकरणांमध्ये कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तींना क्षमा करण्याचा अधिकार आहे. जसे- फेडरल कायद्याच्या विरोधात गुन्ह्यासाठी लागू केलेली शिक्षा, लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेत आणि जर शिक्षेचे स्वरूप मृत्युदंड असेल तर राष्ट्रपतींकडे माफीची याचना करण्यात येते परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राष्ट्रपती माफीचा अधिकार वापरू शकत नाहीत. दयेच्या याचिकेवर निर्णय देताना राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा लागतो असं सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये म्हटले आहे.