वॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नावर अमेरिकेनं त्यांची भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार नसल्याची भूमिका ट्रम्प प्रशासनानं घेतली. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या माध्यमातू भारतावर दबाव आणण्याची पाकिस्तानची खेळी होती. मात्र ती पूर्णपणे अपयशी ठरली.अमेरिका त्यांच्या जुन्या धोरणानुसार वाटचाल करणार असल्याची माहिती अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन सिंगला यांनी दिली. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन काश्मीर प्रश्न सोडवावा, अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याची स्पष्ट भूमिका भारतानं ट्रम्प प्रशासनाकडे मांडली. यामुळे आता ट्रम्प यांनी घूमजाव करत मध्यस्थी करण्यास नकार दिला. काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे या भागातील प्रश्न कायम देशांतर्गत स्वरुपाचे असतील. त्यात कोणत्याही तिसऱ्या देशानं लक्ष घालण्याची गरज नाही, अशी भारताची पूर्वीपासूनची स्पष्ट भूमिका आहे. मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानं पाकिस्ताननं नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगातील अनेक देशांकडे मदतीसाठी विनंती करत आहेत. मात्र अद्याप तरी पाकिस्तानला कोणीही मदतीचा हात दिलेला नाही. कायम पाठिशी राहणाऱ्या चीनकडे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी सहाय्य मागण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही पाकिस्तानला अपयश आलं.
काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 11:27 IST