Donald Trump Oath taking Ceremony : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातील देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रमुख नेते उपस्थित होते. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. ते नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलेले पत्र घेऊन पोहोचले होते. या शपथविधी सोहळ्यानंतर एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, "आज वॉशिंग्टन डीसी येथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वन्स यांच्या शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणे, हा एक मोठा सन्मान आहे."
काय म्हणाले नरेंद्र मोदी?डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की,"माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा."
शपथविधी सोहळ्याला ७०० पाहुणेडोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला ७०० पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय, इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन देखील यावेळी सहभागी झाले होते.