वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात भारतात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दिला गेलेला सुमारे १८२ कोटी रुपयांचा निधी ‘कुणी दुसरेच निवडून यावेत’ म्हणून दिला जात होता, असा गंभीर आरोप विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका जाहीर सभेत केला.
पूर्वीच्या सरकारवर युनायटेड स्टेटस् एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या नावाखाली बेहिशेबी पैसा वाया घालवल्याचा आरोप मियामीमध्ये ट्रम्प यांनी केला. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली ‘डोज’ विभागाने अमेरिकी निधीचा पर्दाफाश करीत भारत किंवा बांगलादेशला दिलेल्या रकमाच जाहीर केल्या. तेथील निवडणुकांत अप्रत्यक्ष हस्तक्षेपाचा गंभीर आरोप यामुळे झाला.
आम्ही पैसा का देतोय?
भारताकडे खूप पैसा आहे, आम्ही हा पैसा का देत आहोत, असा प्रश्न उपस्थित करून ट्रम्प यांनी भारत हा जगातील सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक असल्याचे सांगितले. अमेरिकाही तेथे फार क्वचित व्यापार करू शकते, असे ट्रम्प म्हणाले.