तेल अवीव - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविराम घडवून युद्धातून माघार घेतली आहे. मात्र त्यांचा सहकारी देश इस्रायल युद्धाच्या मैदानात गोंधळलेल्या अवस्थेत पडला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर विजयाची घोषणा केली आहे पण इराणने अमेरिकेची एकही अट स्वीकारलेली नाही ही वस्तूस्थिती आहे. याउलट आता तेहरानने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे इस्रायलला धक्का बसला आहे. इस्रायलमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नेतन्याहूंवर अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. इस्रायली माध्यमे देशाच्या सरकारला कडक प्रश्न विचारत आहेत.
इराणने आपल्या अधिकृत निवेदनात जहाजांच्या वाहतुकीसाठी अटी घातल्या आहेत, त्यामुळे त्यांनी खरोखरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली केला आहे का? असा प्रश्न इस्रायली सरकारला विचारला जात आहे.इराणी लष्कराच्या परवानगीशिवाय कोणतेही जहाज होर्मुझमधून जाऊ शकत नाही. युद्धविराम झाल्यानंतरही इराणने मध्य इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. युद्धविराम झाल्यानंतरही असे हल्ले होतील अशी इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने आधीच अपेक्षा केली होती.
युद्धविरामामुळे इस्रायलला धक्का का बसला?
एकीकडे इराण आणि त्याच्या सहयोगी संघटना ते विजयी झाल्याचं सगळीकडे सांगत आहेत आणि दुसरीकडे या युद्धातून काय साध्य झाले आहे असा प्रश्न इस्रायलमध्ये विचारला जात आहे. इराणचे ४५० किलोग्रॅम संवर्धित युरेनियम कुठे आहे? भविष्यात अणुबॉम्ब बनवणार नाही, असे लेखी आश्वासन इराणने दिले आहे का? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने वृत्तसंस्थांमार्फत एक १०-कलमी योजना प्रसिद्ध केली, जी वॉशिंग्टनला सोपवण्यात आली आणि हीच योजना वाटाघाटींचा आधार बनू शकते असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या घोषणेमुळे इस्रायलला विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे.
गेल्या काही आठवड्यांत इराणने अमेरिकेकडे केलेल्या आपल्या कोणत्याही मागण्यांवरून माघार घेतलेली नाही. येत्या दोन आठवड्यांत तेहरानची भूमिका थोडी नरम होण्याची शक्यता आहे पण सध्या तरी अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे आशावादी असण्याचे कुठलेही ठोस कारण नाही. ट्रम्प केवळ तणाव कमी करण्याचा मार्ग शोधत होते. त्यात पाकिस्तानी मध्यस्थांनी ट्रम्प यांना ती संधी उपलब्ध करून दिली आहे असं वृत्तपत्रात छापण्यात आले आहे. युद्धविरामामुळे ट्रम्प युद्धाच्या जबाबदारीतून ट्रम्प मुक्त झालेत. ते इस्रायलला लेबनानमधील अभियान रोखण्यासाठी मजबूर करू शकतात. मात्र सध्याच्या घडीला इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडे तिथल्या जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही.
Web Summary : Trump's Iran ceasefire leaves Israel exposed, facing criticism over its strategy. Iran asserts control over Hormuz Strait, while questions remain about its nuclear program. Netanyhau faces pressure.
Web Summary : ट्रंप के ईरान युद्धविराम से इस्राइल असुरक्षित महसूस कर रहा है, अपनी रणनीति पर आलोचना का सामना कर रहा है। ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य पर नियंत्रण का दावा किया, जबकि उसके परमाणु कार्यक्रम पर सवाल बने हुए हैं। नेतन्याहू पर दबाव।