इस्लामाबाद - पश्चिम आशियातील वाढत्या तणावात आता सर्वांचे लक्ष पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर लागले आहे. याच ठिकाणी अमेरिका आणि इराण यांच्यात बैठक होणार आहे. परंतु या हायप्रोफाइल बैठकीपूर्वी पाकिस्ताननं खास तयारी केली आहे ज्याने सगळेच चकीत झालेत. इस्लामाबाद प्रशासनाने अचानक गुरुवार आणि शुक्रवारी २ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. कुठल्या कारणांसाठी हा निर्णय घेतला हे स्पष्ट नाही परंतु यामागे सुरक्षेचे कारण असल्याचं सांगितले जाते. २ मोठ्या जागतिक नेत्यांमध्ये चर्चा होत असताना ही पावले उचलली जातात जेणेकरून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाऊ शकते. इतकेच नाही तर पाकिस्तानातील ज्या हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे ते पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय की, ही सुट्टी केवळ इस्लामाबाद राजधानीपुरती मर्यादित राहील. ज्या आवश्यक सेवा आहेत, जसं पोलीस, हॉस्पिटल, वीज, गॅस हे सामान्यत: सुरू राहतील. त्यामुळे गरज असेल तरच लोकांनी बाहेर पडावे असा सल्ला देण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तयारी का सुरू आहे याबाबत प्रश्न विचारला जात आहे. पाकिस्तान अमेरिका आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. या दोन्ही देशांमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धविराम झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बैठकीत कोण कोण सहभागी?
अमेरिकेच्या वतीने उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स या चर्चेचे नेतृत्व करतील. तर इराणकडून एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वतः पुष्टी केली आहे की, ही बैठक १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबादमध्ये होईल. पाकिस्तानमधील इराणचे राजदूत रझा अमीरी मोघदम यांनी बैठकीसाठी शिष्टमंडळाच्या येण्याची पोस्ट केली होती परंतु काही वेळाने ती हटवण्यात आली. या चर्चेचा उद्देश केवळ तात्पुरती शांतता प्रस्थापित करणे नसून एक कायमस्वरुपी तोडगा काढणे आहे असं शाहबाज शरीफ यांनी सांगितले. या चर्चेचा 'इस्लामाबाद चर्चा' असा उल्लेख करण्यात आला आहे.
चर्चेत काय महत्त्वाचे?
२८ फेब्रुवारीला अमेरिका इस्रायलनं मिळून इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर परिस्थिती चिघळली. इराणने पलटवार करत आखाती देशांमध्येही हल्ले केले. त्यानंतर लेबनान या युद्धात सहभागी झाला. तिथे हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला. स्थिती इतकी भयंकर झाली की हे युद्ध आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली. त्यातच अनेक देशांनी मिळून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तुर्की, इजिप्त, चीनसारख्या देशांनी महत्त्वाची भूमिका निभावली. सौदी अरेबिया, कतार आणि अन्य देशांनीही प्रयत्न केले. त्यात पाकिस्ताननेही पुढाकार घेत अमेरिका आणि इराण यांच्यात २ आठवड्यासाठी युद्धविराम घडवून आणला. परंतु युद्धविरामातही स्थिती नाजूक आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील चर्चेवर पुढचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
Web Summary : Islamabad gears up for Iran-US talks, declaring holidays and clearing hotels for security. Pakistan brokers peace amid regional tensions, aiming for a lasting solution after a fragile ceasefire. High-level delegations will attend the Islamabad talks.
Web Summary : इस्लामाबाद ईरान-अमेरिका वार्ता के लिए तैयार है, सुरक्षा के लिए छुट्टियां घोषित और होटल खाली कराए गए। पाकिस्तान क्षेत्रीय तनाव के बीच शांति स्थापित करने का प्रयास कर रहा है, नाजुक युद्धविराम के बाद स्थायी समाधान का लक्ष्य है। उच्च-स्तरीय प्रतिनिधिमंडल इस्लामाबाद वार्ता में भाग लेंगे।