वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इलॉन मस्क यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली होती. सरकारी तिजोरीवरील खर्चाला आळा घालण्यासाठी नव्याने सरकारी दक्षता विभाग (DOGE) स्थापन करण्यात आला. याच्या प्रमुखपदाची जबाबदारी इलॉन मस्क यांच्याकडे सोपवली. आता इलॉन मस्क यांच्या एका आदेशाने अमेरिकेतील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कामाबाबत तातडीने कळवावे असं या आदेशात म्हटलं आहे.
अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना ते काय काम करतात, विभागाला त्यांची आवश्यकता का आहे हे स्वत: सांगावे लागणार आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना फक्त सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. शनिवारी या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे आदेश प्राप्त झाले ज्यात त्यांना मागील आठवड्यात तुम्ही काय काम केले, विभागाला त्याची गरज काय हे सांगावे लागणार आहे. इतकेच नाही तर जे कर्मचारी याला प्रतिसाद देणार नाहीत त्यांनी राजीनामा दिल्याचे मानले जाईल असं मस्क यांनी घोषणा केली आहे.
CNN रिपोर्टनुसार, अमेरिकेतल्या ऑफिस ऑफ कार्मिक मॅनेजमेंटच्या एचआर ईमेल पत्त्यावरून पाठवलेल्या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, 'कृपया तुम्ही गेल्या आठवड्यात केलेल्या सर्व गोष्टींचे सुमारे ५ बुलेट पॉइंट्ससह या ईमेलला उत्तर द्या आणि तुमच्या व्यवस्थापकाला याची प्रत द्या.' कृपया कोणतीही वर्गीकृत माहिती, लिंक्स किंवा संलग्न फाईल पाठवू नका असं सूचना देण्यात आली आहे. अमेरिकेतल्या बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांना हा ईमेल आल्याचं सांगण्यात येते. या ईमेलनंतर इलॉन मस्क यांनी तातडीने जे या ईमेलला उत्तर देणार नाही त्यांचा नोकरीवरून राजीनामा समजला जाईल अशी घोषणा केली आहे.
दरम्यान, इलॉन मस्क यांच्या कामगिरीवर डोनाल्ड ट्रम्प खूप खुश आहेत. मस्क चांगले काम करत असून त्यांना अधिक आक्रमक होण्याची सूचना ट्रम्प यांनी दिली आहे. मस्क यांच्या आदेशाने सरकारी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या ईमेलला सोमवारी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत उत्तर देण्यात सांगितले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी या ईमेलला प्रतिसाद दिला नाही अशा कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे अमेरिकेत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याच्या भीतीचं वातावरण पसरलं आहे.