बैरुत : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा बीमोड करण्याच्या निर्धारातहत अमेरिकेने बुधवारी सिरियातील या संघटनेच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले चढवीत बॉम्बगोळे डागले. इराकलगतच्या सीमेवरही अमेरिकेने हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जागतिक आघाडीत अरब देशांनी सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी या दहशतवादी संघटनेच्या सिरियातील जवळपास बारा अड्ड्यांवर निशाणा साधत २०० हवाई हल्ले चढविले. या हल्ल्यात इराकी सीमेलगत असलेल्या सिरियातील कैम या शहरात इस्लामिक स्टेटची आठ वाहने उद्ध्वस्त झाली, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले. बगदादच्या पश्चिम भागात आणि उत्तर इराकमधील अड्ड्यांवर हल्ले चढविण्यात आले. पूर्व सिरियात दहशतवाद्यांच्या कब्जातील भागही हवाई हल्ल्यांनी हादरला. या भागातून हे दहशतवादी इराकमध्ये रसद पुरवीत आणि कारवायांसाठी दिग्दर्शन करीत, असे पेंटॅगॉनने सांगितले.
‘इसिस’च्या अड्ड्यांवर अमेरिकेचे हल्ले
By admin | Updated: September 25, 2014 02:59 IST