वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये युरोपीय सैन्य तैनात करण्यास विरोध केला आहे. जर युरोपने युक्रेनमध्ये शांती करारानंतर सैन्य पाठवले तर ते तिसऱ्या महायुद्धाचं कारण बनू शकते असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. युद्धविरामापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली ज्याचा अर्थ वोलोडिमीर झेलेंस्की यांच्याऐवजी नवीन अध्यक्षाच्या निवडीचा मार्ग निवडला जात आहे. ट्रम्प यांचं विधान अशावेळी समोर आलं जेव्हा युक्रेन युद्धाबाबत अमेरिका आणि रशिया यांच्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सौदी अरबमध्ये बैठक झाली आहे.
विशेष म्हणजे, युक्रेनला या बैठकीपासून दूर ठेवल्याबद्दल झेलेंस्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी युक्रेनमध्ये शांततेसाठी एक लाख सैनिक तैनात करण्याची मागणीही केली आहे. द सन रिपोर्टनुसार, फ्लोरिडामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. जर युरोप यूक्रेनमध्ये सैन्य पाठवेल तर हा संघर्ष जागतिक महायुद्धात बदलू शकतो. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि इतर युरोपीय नेत्यांनी युक्रेनमध्ये शांतता सैन्य पाठवण्याचा प्रस्ताव दिला आहे. युक्रेनच्या नेतृत्वाने असे युद्ध लांबू दिले जे कधीही घडू नये असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
सौदी अरबमध्ये झाली बैठक
युक्रेन-रशिया युद्ध संपवण्यासाठी सौदीच्या रियादमध्ये अमेरिका आणि रशियाच्या उच्चपदस्थांनी चर्चा केली. या बैठकीत दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. जवळजवळ पाच तासांच्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी अंतिम शांतता करार होण्यापूर्वी युक्रेनमध्ये निवडणुका घ्याव्यात यावर एकमत झाले. या प्रस्तावामुळे युक्रेनचे अध्यक्ष म्हणून झेलेंस्की यांना हटवले जाऊ शकते आणि कीवमध्ये रशिया समर्थक नेतृत्व सत्तेत येऊ शकते अशा अटकळींना उधाण आले आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये नव्याने निवडणूक घेण्याचा प्रस्ताव रशियाकडून नाही तर आमच्याकडून देण्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. युक्रेनमध्ये दीर्घ काळापासून निवडणूक झाली नाही. युक्रेनमध्ये आमच्याकडे मार्शल लॉ आहे. जर युक्रेनला वाटाघाटीच्या टेबलावर जागा हवी असेल, तर लोकांनी असे म्हणू नये की निवडणुका खूप उशीरा झाल्या आहेत आणि त्या व्हायला हव्यात? असंही ट्रम्प यांनी सांगितले.