कोलंबो : श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीसाठी नागरिकांनी गुरुवारी मोठ्या संख्येने मतदान केले. तिसऱ्यांदा सत्तारूढ होऊ इच्छिणारे विद्यमान राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे आणि त्यांचेच एकेकाळचे मित्र असलेले मैत्रीपाला सिरीसेना रिंगणात आहेत. मुस्लिम व तामिळबहुल भागात मतदानाचे प्रमाण विलक्षण राहिले. त्यामुळे निवडणूक राजपाक्षेंसाठी कठीण बनल्याचे बोलले जात आहे. मतदानाच्या पहिल्या सात तासांत बहुतांश भागात ६५ ते ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मतदानादरम्यान कोणत्याही हिंसाचाराचे वृत्त नसले तरी खासगी निगराणी संघटना कॅम्पेन फॉर फ्री अॅण्ड फेअर इलेक्शन्सने काही मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचे सांगितले. दुपारी चार वाजता मतदान संपले. टपाल मतदानाचा निकाल आज रात्री दहा वाजता आम्ही जाहीर करू शकू, अशी आम्हाला आशा आहे, असे निवडणूक आयुक्त महिंदा देशप्रिया यांनी सांगितले. देशाच्या २१ दशलक्ष लोकसंख्येपैकी एक कोटी ५८ लाख ६ हजार ५९८ पात्र मतदार आहेत. मतदानासाठी १,०७६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. निवडणूक रिंगणात १९ उमेदवार असले तरी मुख्य लढत राजपाक्षे आणि सिरीसेना यांच्यातच होती. देशभरात मतदाराच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या, असे कॅम्पेन फॉर फ्री अॅण्ड फेअर इलेक्शन्सच्या कीर्ती तेन्नाकून यांनी सांगितले. राजपाक्षे यांनी आपणच सत्तेत परतू असा विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
श्रीलंकेत अभूतपूर्व मतदान, राजपाक्षेंची कठीण परीक्षा
By admin | Updated: January 9, 2015 02:14 IST