येरेवन : आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्धात अझरबैजानने ३,००० सैनिक गमावल्याचे वृत्त आहे. नागोर्नाे- कराबाख भागावरून या दोन देशांत युद्ध पेटले असून, सहा दिवसांनंतरही यात तोडगा निघताना दिसत नाही.या दोन देशांच्या युद्धात तुर्कीने अझरबैजानच्या समर्थनार्थ अतिरेक्यांना युद्धात उतरविल्याचेही सांगितले जात आहे. आर्मेनियाच्या उपविदेशमंत्र्यांनी असा दावा केला की, तुर्की आणि पाकिस्तानमुळे या दोन देशांतील युद्ध आणखी वाढण्याची शक्यता आहे.फ्रान्सनेही असा दावा केला आहे की, तुर्कीने हजारो अतिरेक्यांना अझरबैजानच्या समर्थनार्थ युद्धात उतरविले आहे. नागोर्नो- काराबाखच्या ताब्यावरून सुरू झालेल्या या युद्धाचा परिणाम आर्मेनिया आणि अझरबैजानच्या अनेक शहरांवर दिसून येत आहे. अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. युद्धात अतिरेक्यांनी उडी घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते, असेही सांगितले जात आहे.
आर्मेनिया-अझरबैजानच्या युद्धात आता अतिरेक्यांनी घेतली उडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 02:49 IST