Trump vs Musk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचे रुपांतर शाब्दिक युद्धात झाले असून, दोघेही 'एक्स'वर एकमेकांविरोधात अतिशय टोकाच्या पोस्ट करताना दिसत आहेत. पण, या वादात आता इलॉन मस्क यांनी माघार घेतल्याचे दिसते. त्यांनी एक्सवर पोस्ट करत, यापूर्वी ट्रम्प यांच्याविरोधात केलेल्या सर्व पोस्टबाबत पश्चाताप व्यक्त केला आहे.
वादाचे कारण काय होते?अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी इलॉन मस्क यांची सरकारी कार्यक्षमता विभागाच्या (DOGE) प्रमुख पदावर नियुक्ती केली होती. पण, काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी या पादाचा राजीनामा दिल्यानंतर वाद वाढला. मस्क यांनी ट्रम्प यांच्या खर्च आणि कर कपात विधेयकावर(वन बिग ब्युटीफुल बिल) जोरदार टीका केली. यावर ट्रम्प यांनी दावा केला होता की, मस्क यांना या बिलाबाबत आधीपासून माहिती होती. मात्र, मस्क यांनी हा दावा फेटाळून लावला.
एवढेच नाही, तर मस्क यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाला पाठिंबा देणारी पोस्ट केली आणि ट्रम्प यांचे जेफ्री एपस्टाईनशी असलेले जुने संबंध उकरुन काढले. त्यानंतर हे प्रकरण इतके वाढले की, ट्रम्प यांनी उघडपणे मस्कच्या कंपन्यांसोबत, विशेषतः स्पेसएक्ससोबतचे सरकारी करार आणि अनुदान संपवण्याचा इशारा दिला. तसेच, इलॉन मस्कने डेमोक्रॅटिक उमेदवारांना, विशेषतः रिपब्लिकन पक्षाच्या कर विधेयकाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना निधी दिला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही ट्रम्प म्हणाले.
मस्क यांची मागणीडोनाल्ड ट्रम्प सरकारच्या खर्च आणि कर कपात विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरील कर सूट संपवण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेचे मागील बायडेन सरकार नवीन ईव्ही खरेदीवर $7500 ची कर सूट देत असे. ट्रम्प ते संपवणार आहेत. या विधेयकात अशी तरतूद आहे की, 2009 ते 2025 दरम्यान 2 लाख ईव्ही विकलेल्या कंपन्यांना सूट मिळणार नाही. हा इलॉन मस्क यांच्या टेस्लाला थेट धक्का आहे.
दुसरे कारण म्हणजे, इलॉन मस्क त्यांच्या विश्वासू जेरेड आयझॅकमन यांना अमेरिकन अंतराळ संस्था नासामध्ये प्रशासक म्हणून नियुक्त करू इच्छित होते, परंतु ट्रम्प यांनी त्यांच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केले. मस्क यांचा असा विश्वास होता की, जर आयझॅकमन नासामध्ये प्रशासक झाले, तर त्यांची कंपनी स्पेसएक्सलाही त्याचा फायदा होईल. यावरुन दोघांमध्ये वाद वाढला. पण, आता मस्क यांनी पश्चाताप व्यक्त केला आहे.