युद्ध आणि तणावाच्या वातावरणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आपल्यावर शेकू नयेत म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे. इराणकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या विक्रीवर अमेरिकेने लादलेल्या कडक निर्बंधांमध्ये आता 'सवलत' देण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाने केली आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेले ऊर्जा संकट आणि तेलाच्या गगनाला भिडलेल्या किमती नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतासह इतर देशांना रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास परवानगी दिली होती. युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने रशियन कच्च्या तेलावर निर्बंध लादले होते. तरीही भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता. म्हणून ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ लादले होते. अखेरीस भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे जवळपास बंद केले होते. यानंतर काही दिवसांतच अमेरिकेने इराणवर युद्ध लादून जगासमोर उर्जा संकट निर्माण केले होते.
यामुळे अनेक देशांत इंधनाचे दर वाढून महागाईचा भडका उडाला होता. हे संकट अधिक गडद होऊ नये, म्हणून अमेरिकेने इराणला ठराविक प्रमाणात तेल विक्री करण्याची परवानगी दिली आहे.
ट्रम्प प्रशासनाची नवी रणनीतीट्रम्प यांनी 'मिशन इराण' पूर्ण होत असल्याचे संकेत दिले असतानाच, ही सवलत देऊन एक प्रकारे कूटनीतिक दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. "आम्हाला जगाला अंधारात ढकलायचे नाही, तर अमेरिकेचे हित जपताना जागतिक बाजारपेठेत स्थिरता आणायची आहे," अशी भूमिका व्हाईट हाऊसकडून मांडण्यात आली आहे.
भारतासह मित्र राष्ट्रांना मोठा दिलासाइराणवरील या सवलतीचा सर्वाधिक फायदा भारतासारख्या विकसनशील देशांना होणार आहे, जे मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतात. इराणकडून तेल खरेदीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर राहण्यास मदत होऊ शकते.