एकीकडे एमेझॉनच्या मालकाच्या ग्रँड लग्नाची चर्चा सगळीकडे सुरु असतानाच एक नवीन जोडपे चर्चेत आले आहे. हे जोडपे दुसरे तिसरे कोणी नसून दोन्ही प्रसिद्धच आहेत. एक म्हणजे प्रसिद्ध गोल्फर टायगर वुड्स आणि दुसरी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक सून व्हेनेसा ट्रम्प.
टायगर वुड्सने त्यांचे रोमँटीक फोटो पोस्ट करून याची माहिती दिली आहे. प्रेम हवेत आहे आणि तू माझ्यासोबत असशील तर आयुष्य अधिक चांगले होईल! आम्ही एकत्र आयुष्याच्या प्रवासाची वाट पाहत आहोत. यावेळी आमच्या हृदयाच्या जवळच्या सर्वांसाठी प्रायव्हसीची आम्हाला अपेक्षा आहे. असे टायगरने म्हटले आहे.
टायगर वुड्सने जोडप्याचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. एकात ते शेजारी शेजारी उभे आहेत, तर दुसऱ्यात ते एका झोपाळ्यावर एकमेकांच्या बाहुपाशात झोपलेले दिसत आहेत. टायगरची ही पोस्ट काहींना आश्चर्यचकित करणारी असू शकते, कारण तो सहसा त्याचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत खाजगी ठेवतो.
या पोस्टवर अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहींनी आता प्रायव्हसीची गरज काय असा गंमतीशीर सवालही केला आहे. अशी सार्वजनिक घोषणा केल्यानंतर लगेचच गोपनीयतेची मागणी का करत आहे, असा सवालही केला आहे.
टायगर आणि व्हेनेसा यांच्या नात्याबद्दल गेल्या काही आठवड्यांपासून टॅब्लॉइड्स आणि मनोरंजन वृत्तपत्रांमध्ये चर्चा सुरू होती. दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले होते. हे दोघे डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता त्यांच्या लग्नाची चर्चा होऊ लागली आहे.