सिडनी - ऑस्ट्रेलियात रविवारी 'मार्च फॉर ऑस्ट्रेलिया' नावाने स्थलांतरविरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले. ज्यात हजारो लोकांनी सहभाग घेतला. ही रॅली सिडनी, मेलबर्न, कॅनबरा यासह अनेक शहरांमध्ये झाली ज्यात मुख्यतः भारतीय स्थलांतरितांना लक्ष्य करण्यात आले. रॅलीच्या प्रचार सामग्रीत '५ वर्षांत भारतीयांची संख्या ग्रीक आणि इटालियनांच्या १०० वर्षांपेक्षा जास्त' झाल्याचा उल्लेख करून भारतीय स्थलांतरितांवर निशाणा साधण्यात आला. या रॅलीत निओ-नाझी आणि उजव्या विचारसरणीच्या गटांचा सहभाग असल्याचे दिसून आले ज्यामुळे काही ठिकाणी हिंसक संघर्षही झाला. डाव्या सरकारने या रॅलीला द्वेष पसरवणारी आणि अतिरेकी म्हणून निंदा केली.
सिडनीत सुमारे ८,००० लोकांनी रॅलीत भाग घेतला तर मेलबर्न आणि इतर शहरांमध्येही हजारोंनी निषेध नोंदवला. रॅली आयोजकांनी 'मास मायग्रेशन' थांबवण्याची मागणी केली. प्रचार पत्रकांमध्ये भारतीय स्थलांतरितांना विशेष लक्ष्य करण्यात आले. या रॅलीमुळे भारतीय समुदायाच्या नेत्यांनी स्थलांतरितांना घरात राहण्याचा सल्ला दिला, कारण कामगारांना लक्ष्य केले जाण्याची भीती वाटत होती. मेलबर्नमध्ये रॅलीदरम्यान समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष झाला ज्यात पोलिसांनी अनेकांना अटक केली. रॅलीत पॉलीन हॅन्सन सारख्या राजकीय नेत्यांचाही सहभाग नोंदवत स्थलांतरविरोधी भूमिका घेतली.
ऑस्ट्रेलियात २०२५ मध्ये स्थलांतर ही एक प्रमुख समस्या बनली आहे. कोविडनंतरच्या काळात स्थलांतराचे प्रमाण वाढले असून २०२२ ते २०२५ काळात अपेक्षेपेक्षा ३,५०,००० जास्त स्थलांतरित आले. यामुळे घरांच्या किंमती वाढल्या, महागाई वाढली त्याशिवाय गृहनिर्माण संकट निर्माण झाले असा आरोप इथल्या लोकांनी केला. या रॅलीत 'ऑस्ट्रेलिया फर्स्ट' च्या घोषणा देण्यात आल्या आणि स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीच्या प्रचार साहित्यात भारतीयांचा उल्लेख करत भारतीय स्थलांतरितांची संख्या २०१३ ते २०२३ या काळात दुप्पट झाल्याचं म्हटलं.
दरम्यान, आमच्या देशात अशा लोकांसाठी जागा नाही, जे सामाजिक एकतेचे विभाजन करत देशाला कमकुवत बनवत आहेत. आम्ही या रॅलीविरोधात आधुनिक ऑस्टेलियासाठी उभे आहोत असं इथले गृह मंत्री टोनी बर्क यांनी सांगितले. सोबतच कामगार मंत्री मरे वाट यांनीही या रॅलीचा निषेध केला. जी रॅली द्वेष पसरवते, समुदायात फूट पाडते त्याचा आम्ही निषेध करतो असं कामगार मंत्र्यांनी भाष्य केले.