गेल्या काही दशकांमध्ये चीनने जागतिक महाशक्ती होण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. अनेक प्रतिस्पर्धी देशांना मागे देत आता चीनने अमेरिकेसमोरही मोठं आव्हान उभं केलं आहे. सध्या अमेरिकेसोबत चीनचं व्यापारी युद्ध सुरू असतानाच चिनी संशोधकांनी असं काही केलंय की ज्यामुळे अमेरिका रशियासह सर्वच देश अवाक् झाले आहेत. चीनने थोरियमवर चालणारं पहिलं संयंत्र तयार करण्यात यश मिळवलं आहे. चीनमधील गांसू प्रांतातील वुई शहरामध्ये हे संयंत्र लावण्यात आलं आहे. खरंतर थोरियमवर आधारित अणू संयंत्राची कल्पना जगासाठी नवी नाही आहे. मात्र चीनने ती प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहे.
या संयंत्राला थोरियम मोल्टन रिअॅक्टर असंही म्हटलं जातं. याची क्षमता दोन मेगावॅट एवढी वीज उत्पन्न करण्याची आहे. चीनने २०२३ साली ऑक्टोबर महिन्यात या संयंत्राच्या कामाला सुरुवात केली होती. अणुविज्ञानाच्या दृष्टीने चीनने मिळवलेलं यश मोठं आहे. मात्र थोरियमवर आधारित संयंत्रामधून मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जा निर्माण करण्यास अजून तरी बराच वेळ लागणार आहे.
दरम्यान, भारताकडे जगातील सर्वात मोठे थोरियमचे साठे आहेत. तसेच त्याच्या मदतीने भारत हा अणुक्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकतो. खरंतर थोरियम हा स्वत: अणुइंधन नाही आहे. मात्र त्याला युरेनियम २३३ मध्ये परिवर्तित करता येतं. याच युरेनियम २३३ चा वापर अणुभट्ट्यांमध्ये केला जातो. मात्र थोरियमला युरेनिम २३३ मध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि महागडी आहे.
भारतामध्ये थोरियमच्या वापराची सुरुवात डॉ. होमी भाभा यांनी केली होती. भाभा हे देश आणि जगातील प्राख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताकडे असलेल्या युरेनियमच्या मर्यादित साठ्यांचा विचार करून अणुऊर्जा प्राप्त करण्यासाठी थोरियमच्या वापराबाबत संशोधन केलं होतं. तसेच त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशही मिळालं होतं. भारताने थोरियमवर आधारिक एका अणुभट्टीची प्रायोगिक तत्त्वावर उभारणीही केली होती. मात्र या क्षेत्रात पुढे म्हणावं तेवढं काम झालं नाही. पण आता या ऊर्जेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलं आहे.