मॉस्को - भारताने रशियन सैन्यात भारतीय नागरिकांच्या भरतीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे मंत्री सर्गेई लावरोव यांच्या भेटीत हा मुद्दा मांडला. त्यानंतर रशियानेही भारताच्या मागणीवर योग्य ती पाऊले उचलून लवकरच हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करू असा शब्द दिला आहे. युक्रेन युद्धाच्या काळात रशियाने मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांना त्यांच्या सैन्यदलात भरती केले. ज्यात भारतीयांचाही समावेश आहे. त्यानंतर भारत सातत्याने रशियावर भारतीय नागरिकांना त्यांच्या सैन्यातून हटवून त्यांना मायदेशी पाठवण्याची मागणी करत आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबतच्या चर्चेत एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा रशियन सैन्यातील भारतीयांचा मुद्दा मांडला. मागील काळात अनेक भारतीयांची रशियाने सैन्यातून सुटका केली आहे परंतु आजही काही प्रकरणे प्रलंबित आहेत, काही लोक बेपत्ता आहेत. जयशंकर यांनी लावरोव यांना म्हटलं की, रशिया तातडीने यावर तोडगा काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारताने याआधीही रशियासमोर हा मुद्दा उचलला होता. त्यानंतर रशियानेही मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांना त्यांच्या सैन्यातून हटवले होते. परंतु त्यातील काही दुर्गम भागात, सक्रीय सैन्य संघर्षात सहभागी असल्याने त्यांच्या परतण्यास विलंब होत आहे.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी रशियासोबत व्यापार वाढवण्यावर भर दिला. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आयोजित भारत-रशिया बिझनेस फोरममध्ये ते बोलत होते. रशियाकडून तेल खरेदीमुळे अमेरिकन ट्रम्प प्रशासन भारतावर टॅरिफ लावत आहे. रशियाशी व्यापार करून भारत एकप्रकारे युक्रेन युद्धात त्याची मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेचा आहे. त्याच आरोपातून अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ भारतावर लावला आहे. येत्या २७ ऑगस्टपासून हा टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल.
दहशतवादाविरोधात एकत्रित लढणार
भारत आणि रशिया दहशतवादाचा निषेध करते, आम्ही दोन्ही देश मिळून दहशतवादाला उत्तर देऊ. भारत रशियातील संबंध खूप जुने आहेत. जगात आजही सर्वात मजबूत संबंधांपैकी भारत-रशियाचे नाव आहे. एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता भारत आणि रशिया दोघे दहशतवादाला चोख उत्तर देऊ असं विधान केले. लोकांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्याला भारत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकसारखी कारवाई करण्यास मागे हटणार नाही हे भारताने आधीच दाखवून दिले आहे असंही जयशंकर यांनी म्हटलं.