Donald Trump Hamas News: तब्बल १५ महिन्यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम झाला. शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून ओलिसांना सोडण्यात येत आहेत. पण, आता हमासने इस्रायलवर आरोप केला आहे. इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा दावा हमासने केला आहे. त्यामुळे आम्ही ओलिसांना सोडण्याची प्रक्रिया थांबवू शकतो. यावरूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला इशारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इस्रायली ओलिसांना परत पाठवण्याची प्रक्रिया रोखण्याच्या हमासच्या भूमिकेनंतर डोनाल्ड यांनी थेट नरकाचे दरवाजे उघडू असा इशारा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास ओलिसांना सोडण्यासाठी शनिवारपर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा हमास मेसेज काय?
वृत्तसंस्था रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर भाष्य केले आहे. त्याचबरोबर जॉर्डन आणि इजिप्त यांनी गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी शरणार्थींना आश्रय देण्यास नकार दिल्यास त्यांची मदत रोखण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
हमासच्या भूमिकेबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, "गाझा पट्टीत ओलिस ठेवण्यात आलेल्या सर्व लोकांना शनिवारी दुपारपर्यंत सोडण्यात आले नाही, तर आम्ही इस्रायल-हमास शस्त्रसंधी प्रस्ताव संपुष्टात आणू आणि हमासला संपवण्याचा प्रस्ताव ठेवू", अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली.
हमासने इस्रायली ओलीस नागरिकांना सोडण्यावर स्थगिती आणली आहे. हमासने इस्रायलवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की, संघर्ष पुन्हा सुरू होऊ शकतो.
शनिवारी होणार ओलिसांची सुटका?
शस्त्रसंधी करारानुसार, पॅलेस्टिनी कैदी आणि ओलिसांच्या बदल्यात हमास शनिवारी ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करणार आहे. मागील तीन आठवड्यांपासून अशाच पद्धतीने ही प्रक्रिया सुरू आहे.
पण, हमासने ओलीसांना सोडण्याची प्रक्रिया थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर सोमवारी (१० फेब्रुवारी) रात्री ओलीस नागरिकांच्या कुटुंबीयांनी तेल अवीवमधील त्या क्षेत्रात गर्दी केली होती. या परिसराला सध्या ओलीस चौक म्हणून ओळखले जाते. आंदोलकांनी शस्त्रसंधी कराराचे पालन सरकारने करावे अशी मागणी इस्रायल सरकारकडे केली.