इस्त्रायल हमास युद्धबंदीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट घेतली. या भेटीनंतर व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत घेत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत यापुढे अमेरिका गाझा पट्टीवर नियंत्रण करेल असं सांगितलं. गाझा इथं फिलिस्तिनियांचे काही भविष्य नाही, त्यांनी अन्य कुठे जायला हवं. अमेरिका गाझा पट्टीवर कब्जा करणार आणि आम्ही एकत्र मिळून काम करू असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे.
गाझा घेणार नव्याने उभारी
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, गाझाला आम्ही आमच्या अधिकार क्षेत्रात घेऊ. त्याठिकाणचे सर्व धोकादायक बॉम्ब आणि हत्यारे नष्ट करू, उद्ध्वस्त झालेल्या इमारती पाडू. आम्ही गाझामध्ये नव्याने आर्थिक विकास करू, त्यातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आणि रहिवासी इमारती उभ्या राहतील अमेरिकेने बनवलेल्या या गाझामध्ये जगभरातील लोक राहू शकतात. गाझाच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी जे जे काही शक्य असेल ते आम्ही करू. आम्ही अशा भागावर कब्जा करणार आहोत जिथे आम्ही पुढील काळात विकास करू असं ट्रम्प यांनी सांगितले.
गाझामध्ये सध्याची परिस्थिती काय?
गाझा पट्टी इथं अनेक दशके इस्त्रायल आणि फिलिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. आज गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांची अवस्था जणू नरकासमान झाली आहे. अमेरिकेच्या शस्त्रांच्या जिवावर इस्रायलने गाझा पट्टीची चाळण केली. लोकांनी शांतता, हिंसामुक्त राहण्यासाठी गाझाबाहेर राहावे असं काही दिवसांपूर्वी ट्रम्प म्हणाले होते.
दरम्यान, गाझामधील लोकांना आता जॉर्डन आणि मिस्त्र इन येथे शरण जावे. अमेरिका गाझा ताब्यात घेऊन तिथे विकास करेल. गाझात परतण्याऐवजी जिथं चांगली जागा मिळेल तिथे फिलिस्तानी लोकांनी घर बांधावे, गाझात परतण्यापेक्षा ते चांगले होईल. आता त्यांना गाझा सोडण्याशिवाय पर्याय नाही. मध्य पूर्वेत शांतता आणण्यासाठी गाझा पट्टी ताब्यात घेऊन तिथे विकास करायला हवा. लवकरच मी इस्त्राईल, गाझा, सौदी अरब आणि मध्य पूर्वेचा दौरा करणार आहे असंही ट्रम्प यांनी सांगितले.