संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यंदा मोठाच विचित्र अनुभव आला आहे. त्यांचा प्रवेश, भाषण आणि एस्केलेटरचा अनुभव हा केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर उपस्थितांसाठीही चर्चेचा विषय ठरला. या वेळी ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांवर एकप्रकारे आपला रागच काढला. त्यांनी खराब एस्केलेटर आणि खराब टेलीप्रॉम्प्टरचा किस्सा सर्वांना सांगितला.
एस्केलेटर आणि टेलीप्रॉम्प्टर दोन्ही खराब!
संयुक्त राष्ट्र महासभेत पोहोचल्यावर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प ज्या एस्केलेटरने वर येत होते, ते अचानक मध्येच बंद पडले. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या टीमला पायऱ्यांचा वापर करावा लागला. या प्रकारामुळे ट्रम्प यांना सुरूवातीलाच अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, अडचणी इथेच थांबल्या नाहीत.
भाषण सुरू होताच, अचानक टेलीप्रॉम्प्टरनेही काम करणे बंद केले. यानंतर ट्रम्प यांना प्रिंट केलेल्या नोट्स पाहून बोलावे लागले. या दोन्ही घटनांमुळे ट्रम्प यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'संयुक्त राष्ट्रांकडून मला दोनच गोष्टी मिळाल्या, एक खराब एस्केलेटर आणि एक खराब टेलीप्रॉम्प्टर. मी एवढेच सांगू शकतो की, टेलीप्रॉम्प्टर चालवणाऱ्याची काही खैर नाही.' त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
संयुक्त राष्ट्राने दिले स्पष्टीकरण
टेलीप्रॉम्प्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अध्यक्ष अन्नालेना बेयरबॉक यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, 'संयुक्त राष्ट्रांचे टेलीप्रॉम्प्टर पूर्णपणे ठीक आहेत. त्याचे व्यवस्थापन अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांकडूनच केले जाते.' त्यामुळे हा बिघाड संयुक्त राष्ट्रांमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
शांती प्रयत्नांमध्ये अमेरिका एकटी!
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात जागतिक शांतता आणि सुरक्षा या मुद्द्यांवरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, अमेरिका अनेक देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत आहे, पण संयुक्त राष्ट्रांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यांनी दावा केला की, त्यांनी ७ युद्धे थांबवली आणि अनेक देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. मात्र, तरीही त्यांना संयुक्त राष्ट्रांची मदत मिळाली नाही.
'जर संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या पुढाकाराला पाठिंबाच देत नसेल, तर या संघटनेचा उद्देश काय आहे?' असा प्रश्नही ट्रंप यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे आगामी काळात अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांमधील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.