अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स संघटनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ब्रिक्स देशांवर १५० टक्के टेरिफ लावण्याच्या धमकीमुळे पाच देशांचा हा समूह फिस्कटला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकी डॉलरला आव्हान देण्याच्या ब्रिक्स देशांच्या प्रयत्नांचा काही फायदा होणार नाहीय. हे देश आमच्या डॉलरला उध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांना नवीन चलन सुरु करायचे आहे. यामुळे जेव्हा मी सत्तेत आलो तेव्हाच ब्रिक्सला इशारा दिला होता. यांच्यापैकी जो कोणताही देश नवीन चलन आणण्याचे बोलले त्याच्यावर १५० टक्के टेरिफ आकारले जाईल, असे मी म्हणालो होतो. आम्हाला तुमची उत्पादने नकोत, यानंतर ब्रिक्स संघटना तुटणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ब्रिक्स संघटनेत ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात हे देश सहभागी आहेत. तर तुर्की, अझरबैजान आणि मलेशिया या देशांनी अर्ज केलेला आहे. तर ४० देशांनी ब्रिक्समध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे दक्षिण आफ्रिकेचे ब्रिक्स राजदूत अनिल शुक्ला यांनी सांगितले आहे.
२०२२ मध्ये झालेल्या १४ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नव्या चलनाच्या गरजेबाबत पहिल्यांदा चर्चा झाली होती. पुतीन यांनी हा प्रस्ताव ठेवला होता.
अमेरिकेचे चलन मान्य केल्याने जगावर अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे. या वर्चस्वाला याद्वारे आव्हान दिले जाऊ शकते. ब्रिक्स देशांनी जर त्यांचे चलन आणले तर जगाला त्यांच्याबाजुने जावे लागेल व अमेरिकेचे महत्व कमी होईल. यामुळे ट्रम्प यांनी आता आम्ही गप्प पाहत बसणार नाही, असे आव्हान दिले आहे.
१९९९ ते २०१९ या काळात अमेरिकेतील ९६ टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये झाला होता. तर आशियातील ७४ टक् व्यापार हा डॉलरमध्ये झाला आणि उर्वरित जगात ७९ टक्के व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये झाला होता. यावरून डॉलरचे वर्चस्व किती आहे, हे लक्षात येते.