Paetongtarn Shinawatra Thailand : थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. देशाच्या संवैधानिक न्यायालयाने शुक्रवारी त्यांना नैतिक आचरण उल्लंघन प्रकरणात दोषी ठरवले. पतोंगटार्न शिनावात्रा यांना वर्षापूर्वी पंतप्रधान बनवण्यात आले होते आणि त्या देशातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या होत्या. पण जूनमध्ये लीक झालेल्या टेलिफोन कॉल दरम्यान पतोंगटार्न या माजी कंबोडियन नेते हुन सेन यांच्यासमोर राजकीय बाबींंमध्ये झुकल्याचे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्यावेळी सीमा वादावरून दोन्ही देशांमध्ये खूप तणाव होता. काही आठवड्यांनंतर दोन्ही देशांमध्ये पाच दिवस संघर्ष सुरू होता. या संभाषणामुळे राष्ट्रीय हितसंबंधांना आणि पंतप्रधानपदाच्या नैतिक जबाबदाऱ्यांना धक्का पोहोचला असे न्यायालयाचे मत आहे. या निर्णयानंतर, संसद आता नवीन पंतप्रधान निवडणार आहे.
नवीन पंतप्रधान निवडणे कठीण
नवीन पंतप्रधान निवडण्याच्या प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो. कारण, पतोंगटार्न शिनावात्रा यांच्या पक्षाचे बहुमत खूपच कमकुवत आहे आणि त्यांना युती वाचवण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात. गेल्या वर्षी संवैधानिक न्यायालयाने माजी पंतप्रधान स्रेथा थाविसिन यांनाही पदावरून केले होते. त्यावेळी पतोंगटार्न शिनावात्रा यांना अचानक पंतप्रधान बनवण्यात आले.
पुढचा पंतप्रधान कोण होऊ शकतो?
रॉयटर्सच्या मते, आता सत्तेची समीकरणे बदलू शकतात. संसद नवीन पंतप्रधान निवडेपर्यंत उपपंतप्रधान फुमथम वेचैचाई आणि त्यांचे मंत्रिमंडळ अंतरिम सरकार चालवतील. संभाव्य उमेदवारांमध्ये, फ्यू थाई पक्षाचे फक्त एकच नाव आहे. ते ७७ वर्षीय असून त्यांचे नाव चैकासेम नितिसिरी आहे. ते राजकारणात तुलनेने शांत भूमिका बजावत आहेत. इतर नावांमध्ये माजी पंतप्रधान आणि लष्करी नेते प्रयुथ चान-ओचा (जरी राजकारणातून निवृत्त झाले आहेत) आणि अनुतिन चार्नविराकुल यांचा समावेश आहे. लीक झालेल्या कॉल वादानंतर अनुतिनने अलीकडेच पतोंगटार्न शिनावात्राच्या सरकारकडून आपला पाठिंबा काढून घेतला.
फोन कॉल लीक झाल्यामुळे खुर्ची गेली...
कंबोडियासोबतचा सीमा वाद नुकताच संपला असताना शिनावात्रा यांनी आपले स्थान गमावले आहे. मे महिन्यात थायलंड आणि कंबोडियामध्ये वादग्रस्त सीमा क्षेत्रावरून संघर्ष झाला होता. त्यानंतर थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या संभाषणात शिनावात्रा यांनी लष्कराच्या जनरलवरही टीका केली. त्यांनी हुन सेन यांना काका असेही संबोधले. या संभाषणाचा ऑडिओ नंतर लीक झाला. थायलंडमधील सैन्यावर टीका केल्याने लोक नाराज झाले, ज्यासाठी शिनावात्रा यांना माफी मागावी लागली.