Pahalgam Terror Attack Donald Trump: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सावध भूमिका घेताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ट्रम्प म्हणाले की, हा हल्ला खूप वाईट आहे. पण, मी भारताबरोबरच पाकिस्तानसाठीही खूप जवळचा आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांच्या पातळीवर मिटवून घेतील, अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी व्हॅटिकन सिटीकडे विमानाने जात होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाबद्दल त्यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.
वाचा >> "जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
काश्मीर मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष -ट्रम्प
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मी भारतासाठी खूप जवळचा आहे आणि पाकिस्तानसाठीही. जसे की तुम्हाला माहिती आहे, काश्मीर प्रश्नावरून दोन्ही देशांमध्ये मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. काश्मीर प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे. पण, जो दहशतवादी हल्ला झाला, तो खूपच वाईट आहे. खूपच वाईट झाले.'
ट्रम्प म्हणाले, 'मी दोन्ही नेत्यांना ओळखतो'
भारत पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाबद्दल ट्रम्प म्हणाले, 'त्यांच्या सीमेवर अनेक वर्षांपासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. नेहमीच अशी स्थिती राहिलेली आहे. पण मला विश्वास आहे की, ते (भारत-पाकिस्तान) कोणत्या न कोणत्या पद्धतीने यातून मार्ग काढतील. मी दोन्ही नेत्यांना ओळखतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता असलेला तणाव हा नेहमीच राहिलेला आहे.'
इराणने दिला मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेल्यानंतर इराणने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सईद अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान बंधुत्व असलेले शेजारी आहे. दोन्ही देशात शांतता आणि स्थिरता राहावी, हीच इराणची प्राथमिकता आहे.