पॅरिस - दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी भारत माता की जय, मोदी-मोदी या घोषणांदरम्यान मोदींनी भारत आणि फ्रान्समध्ये समान दुवे असल्याचे सांगितले. तसेच आपल्या सरकारने केल्या कामगिरीचा लेखाजोखा मोदींनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच आता या देशात टेम्पररी असे काही राहिलेले नाही. जे टेम्पररी होते ते आम्ही काढून टाकले आहे, आता स्थायी व्यवस्थेच्या दिशेने देश निघाला आहे, असे सांगत मोदींनी कलम 370 हटवण्याच्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरही हल्लाबोल केला. नवा स्वप्नांचा भारत आता नव्या प्रवासाला निघाला आहे, असेही मोदींनी सांगितले. मोदी म्हणाले, भारतात आता टेम्पररी व्यवस्थेला स्थान नाही. तुम्ही पाहिले असेल की 125 कोटी लोकांचा देश, गांधी आणि बुद्धांची भूमी, राम-कृष्णाच्या भूमीवरून टेम्पररीला काढता काढता 70 वर्षे निघून गेली. टेम्पररी गोष्ट घालवण्यासाठी 70 वर्षे, मला तर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले होते,'' असा टोला त्यांनी कलम 370 वरून लगावला. दरम्यान, संबोधनापूर्वी मोदींनी मोबलां येथील पर्वतांवर अपघातग्रस्त झालेल्या दोन विमानांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाचेही मोदींनी उदघाटन केले. यावेळी मोदींनी हे स्मारक उभारल्याबद्दल लोकांचे आभार मानले. ते म्हणाले, '' या अपघातग्रस्त विमानांपैकी एका विमानामधून भारताचे महान शास्त्रज्ञ होमी भाभा प्रवास करत होते. या अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, असे मोदी म्हणाले.
गांधी-बुद्धांच्या देशात टेम्पररीला स्थान नाही, पॅरिसमधून मोदींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:07 IST