चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढू लागलेला असतानाच तैवानला मोठा धक्का बसला आहे. मिसाईल डेव्हलपमेंटच्या मुख्य अधिकाऱ्याचा एका हॉटेलमध्ये मृतदेह सापडला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी चीनवर संशयाची सुई जात आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास युनिटचे उपप्रमुख ओउ यांग ली-हसिंग हे शनिवारी सकाळी दक्षिण तैवानमधील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. ते तैवान लष्कराच्या मालकीच्या नॅशनल चुंग-शान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे उपप्रमुख होते.
अमेरिकेच्या नेत्या नॅन्सी पेलोसी जाताच चीनने तैवानवर आक्रमण करण्याच्या हेतूने युद्धसराव सुरु केला आहे. युद्धनौका आणि १०० हून अधिक लढाऊ विमाने तैवानच्या समुद्रात आणि आकाशात भिरभिरू लागली आहेत. चीनने या भागात मिसाईल देखील डागली आहेत. काही मिसाईल ही जपानमध्ये जाऊन पडल्याने खळबळ उडाली आहे.
चीनने तैवानवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. बड्या अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीन आपल्या मुख्य बेटावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनकडून अनेक मिसाईल डागण्यात आल्याचे म्हटले आहे. चीनची लढाऊ विमाने अनेकदा तैवानच्या हवाईक्षेत्रात मध्य रेषा ओलांडून गेली आहेत. मुख्य खंडावर चीन सतत मिसाईल डागू लागला आहे.