देशात वाढलेला भ्रष्टाचार आणि सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधात नेपाळमधील तरुणाईचा उद्रेक झाला होता. तरुणांच्या Gen-Z ने केलेल्या या देशव्यापी आंदोलनामुळे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, देशाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी या सरकारचं प्रमुखपद सांभाळण्यास होकार दिला आहे. तसेच नेपाळचा शेजारील देश असलेला भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट करणारं मोठं विधान केलं आहे.
सुशीला कार्की म्हणाल्या की, मी नरेंद्र मोदी यांना प्रणाम करते. माझ्यावर नरेंद्र मोदी यांचा चांगला प्रभाव आहे. मी नेपाळचं नेतृ्त्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. मी कमी काळासाठी का असेना देशाचं नेतृत्व करावं, यासाठी नेपाळमधील आंदोलनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या Gen-Z गटाने माझ्यावर विश्वास दर्शवला आहे, असेही कार्की यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, या आंदोलनामध्ये ज्यांनी प्राण गमावले, अशा लोकांचा सन्मान करण्यास मी प्राधान्य देणार आहे. आंदोलनादरम्यान, मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी काही तरणी करणं हे आमचं पहिलं काम असणार आहे.
यावेळी नेपाळला पाठिंबा देण्याबाबतच्या भारताच्या भूमिकेबाबत कार्की म्हणाल्या की, मी भारताचा खूप सन्मान करते. तसेच माझं भारतावर प्रेम आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित झाले आहे. भारताने नेपाळला खूप मदत केलेली आहे.
दरम्यान, नेपाळमधील अस्थिर राजकीय इतिहासाचा उल्लेख करत कार्की यांनी सांगितले की, नेपाळमध्ये सुरुवातीपासूनच काही अडचणी राहिलेल्या आहेत. सध्या परिस्थिती कठीण आहे. आम्ही नेपाळच्या विकासासाठी काम करू. आम्ही देशाची नव्याने सुरुवात करू, असेही त्या म्हणाल्या. सुशीला कार्की ह्या नेपाळच्या पहिल्या महिसा सरन्यायाधीश आहेत. त्यांनी २०१६ मध्ये हे पद सांभाळले होते.