टायफून रागासा आणि जोरदार पावसामुळे तैवानमध्ये मोठे नुकसान झाले आहे. एका बॅरियर सरोवराचा बांध फुटल्यामुळे अचानक आलेल्या पाण्यात वाहून गेल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३० जण बेपत्ता आहेत. तर, अनेक घरे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
स्थानिक अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे बॅरियर सरोवराचा बांध फुटला. यामुळे पाण्याचा मोठा लोंढा गुआंगफू टाउनशिपकडे वेगाने वाहू लागला. या घटनेत अनेक लोक पाण्यात वाहून गेले.
या दुर्घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, ३० जणांचा अजूनही शोध सुरू आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी आणि बाधित भागात मदत पोहोचवण्यासाठी देशभरातून बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. तैवानच्या पूर्वेकडील भागात प्रचंड पाऊस झाला, ज्यामुळे अनेक घरे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले.
टायफून रागासाने फिलिपिन्समध्ये मोठा विध्वंस केल्यानंतर आता तो दक्षिण चीन आणि तैवानच्या दिशेने सरकत आहे. हाँगकाँग वेधशाळेनुसार, दक्षिण चीन समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी २२० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. यामुळे हाँगकाँगमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलाइन्सच्या विमानसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय, दक्षिण चीनमधील शेन्झेन शहरातून सुमारे ४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्रानुसार, हे वादळ बुधवारी शेन्झेन आणि ग्वांगडोंग प्रांतातील झुवेन काउंटीदरम्यानच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे. तैवान सरकारने अनेक भागांमधील शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.