भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिने अंतराळात अडकल्यानंतर १८ मार्च रोजी सुखरूपपणे पृथ्वीवर परतल्या होत्या. तेव्हापासून त्या येथील वातावरणाशी पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अंतराळातून सुखरूप परतल्यानंतर सुनिता विल्यम्स यांनी पहिल्यांदाच एक्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्या घरातील पाळीव कुत्रे त्यांचं उत्साहाने स्वागत करताना दिसत आहेत. तसेच आतापर्यंतची सर्वात चांगली घरवापसी अशी प्रतिक्रिया सुनिता विल्यम्स यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
सुनिता विल्यम्स यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या घरात पाऊल ठेवताच त्यांच्या घरातील दोन कुत्रे त्यांच्या भोवती फेर धरताना दिसत आहेत. सुनिता विल्यम्स ह्या सुद्धा त्या कुत्र्यांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. हाच व्हिडीओ सुनिता विल्यम्स यांनी शेअर करत आतापर्यंतची सर्वात चांगली घरवापसी असं त्यावर लिहिलं आहे.
तत्पूर्वी सोमवारी सुनिता विल्यम्स यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तसेच अंतराळात ९ महिने वास्तव्य करत असताना आलेल्या अनुभवांबाबत माहिती दिली होती. यादरम्यान, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी अंतराळातून सुखरूप परत आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांचे आभार मानले होते.
घरी आल्यानंतर मी पहिल्यांदा माझे पती आणि पाळीव कुत्र्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर ग्रिल्ड चिज सँडविचचा आस्वाद घेतला. तसेच माझ्या वडिलांची आठवण काढली, असंही त्यांनी सांगितलं. तसेच आपण लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.