वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पूर्व व मध्य पूर्व भागाला हाडे गोठवणाऱ्या थंडीचा विळखा पडला आहे. या विक्रमी थंडीमुळे शाळा बंद ठेवणे भाग पडले असून ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन पक्ष्यांनाही मोकळ्या जागेऐवजी बंद कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यूयॉर्क राज्याच्या वॉटर टाऊनजवळ प्रचंड बर्फवृष्टी सुरू असून तीन फुटापर्यंत हिमपाताचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साऊथ डाकोटावर बर्फाची चादर पसरली असून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे, असे राष्ट्रीय हवामान सेवेचे हवामानतज्ज्ञ डॅन पीटरसन यांनी सांगितले. माईनेतील इस्टकोर्ट स्टेशन हे कालचे देशातील सर्वांत थंड ठिकाण होते. या ठिकाणी उणे ३८ अंश फॅरेनहाईट एवढे तापमान नोंदले गेले. दक्षिणेकडे फ्लोरिडातील जॅक्सनविलेतही हिमपाताचा कहर सुरू असल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)शाळा बसच्या इंधन वाहिन्या गोठून जाण्याइतपत थंडी असल्यामुळे पोर्टलँड, माईने आणि शिकागोतील शाळा बंद करणे भाग पडले आहे. पिटस्बर्गमध्ये आफ्रिकन पेंग्विनच्या दोन पिलांना खुल्या जागेतून बंद जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. मूळ दक्षिण आफ्रिकेची रहिवासी असलेली ही पिले तापमान वाढेपर्यंत बंद कक्षातच राहणार आहेत. थंड हवेच्या केवळ १५ मिनिटे संपर्कात आले तरी हिमदंश होऊ शकतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांना घरातच ठेवा, असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. थंडीचा कडाका एवढा आहे की, काही ठिकाणी रेल्वे रुळांना तडे गेले असून, त्यामुळे रेल्वे विलंबाने धावत आहेत. थंडीचा हवाई वाहतुकीलाही फटका बसला आहे. दुपारपर्यंत ५१५ उड्डाणे रद्द करण्यात आली, तर १,९३७ विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला.
कडाक्याच्या थंडीचा अमेरिकेला विळखा
By admin | Updated: January 10, 2015 00:24 IST