वेस्ट पाम बीच : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात सत्तेत आल्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध २४ तासांत थांबविण्याची घोषणा केली होती. याबाबत एका मुलाखतीत त्यांना विचारले असता शुक्रवारी ट्रम्प म्हणाले की, २४ तासांत युद्ध थांबवू असे म्हणणे थोडे उपरोधिकच होते. मोठमोठे दावे करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या वक्तव्यातून युद्ध थांबविण्यात अपयशी ठरल्याबाबत त्यांनी एकप्रकारे कबुलीच दिली आहे, असे जाणकार सांगत आहेत.
‘फुल मेजर’ या टेलिव्हिजन कार्यक्रमासाठी त्यांनी दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. सत्ता हातात घेतल्यानंतर ५४ दिवस उलटले आहेत, रशिया-युक्रेन युद्धावर अजूनही समाधान निघालेले नाही. त्यावर ट्रम्प म्हणाले की, प्रचारादरम्यान जेव्हा मी असे सांगितले होते, तेव्हा मी थोडा उपरोधिक होतो. माझा अर्थ असा होता की, मला हे युद्ध थांबवायचे आहे. मला वाटते की, मी यात यशस्वी होईन. रविवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातील एक क्लिप सध्या समोर आली आहे. (वृत्तसंस्था)
...तर ही वाईट बातमीदरम्यान, ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ या आठवड्यात अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी मॉस्कोला पोहोचले आहेत.ट्रम्प यांना विचारले की, जर पुतिन युद्धविरामासाठी तयार झाले नाहीत तर तुमची पुढील योजना काय असेल?त्यावर ट्रम्प म्हणाले की, ही जगासाठी वाईट बातमी असेल, कारण खूप लोक मरण पावले आहेत. पण, मला वाटते की पुतीन तयार होतील.
पुन्हा पुन्हा काय म्हणाले?मे २०२३ मध्ये ट्रम्प म्हणाले की, रशियन व युक्रेनियन मरत आहेत. मी हे सर्व थांबवू इच्छितो, हे २४ तासांत थांबवेन. सप्टेंबरमध्ये माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत वादविवादात ट्रम्प म्हणाले की, मी जिंकलो तर मी नेत्यांशी बोलेन. त्यांना एकत्र आणेन.