शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

जपान : अति काम कराल, तर मराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 10:11 IST

जपान हा देश ‘कार्यमग्न’ देश! जपानमधील लोकांचं आपल्या कामावर प्रचंड प्रेम.

जपान हा देश ‘कार्यमग्न’ देश! जपानमधील लोकांचं आपल्या कामावर प्रचंड प्रेम. केस कापणारा कुणी असू देत किंवा एखाद्या कंपनीचा सीईओ, प्रत्येक जण आपलं काम मन लावून आणि प्रेमानंच करणार. हीच जपानची कार्यसंस्कृती. या कार्यसंस्कृतीमुळेच जपाननं राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशात झेप घेतली, असं इतर देश जपानचं कौतुक करताना म्हणतात. पण प्रत्यक्ष जपानमध्ये मात्र या कार्यसंस्कृतीवर टीका होऊ लागली आहे. माणसांचा जीव वाचवायचा असेल तर सरकारनं जपानचं वर्क कल्चर बदलण्याचं मनावर घ्यायला हवं, असं जपानमधले लोक म्हणू लागले आहेत. जपानमधले शिक्षक अतिरेकी ओव्हर टाइम करून शिणून गेले आहेत. योशिओ कुडो जपानमधील माध्यमिक शाळेचे एक शिक्षक.  सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत शाळेचंच काम करत राहायचे. २००७ मध्ये मेंदूत रक्तस्राव झाला आणि अवघ्या चाळिसाव्या वर्षी  त्यांचा मृत्यू झाला.  त्यांची पत्नी साचिको यादेखील शिक्षिका. आपल्या नवऱ्याचा मृत्यू ‘कारोशी’ने झाला हे त्यांना २०१२ मध्ये लक्षात आलं. 

कारोशी म्हणजे काही संसर्गजन्य रोग नव्हे. कारोशी म्हणजे अति कामानं, कामाच्या अति ताणानं होणारा मृत्यू. अति काम केल्यानं हृदयविकाराचा झटका येणं, पक्षाघात, मेंदूत रक्तस्त्राव होणं किंवा कामाचा अती ताण सहन न झाल्यानं आत्महत्या करणं म्हणजे कारोशी. योशिओ कुडो या शिक्षकाचा मृत्यू कारोशी मृत्यूमध्ये नोंदला गेला.  मृत्यूच्या काही आठवडे आधी योशिओ सतत कामाच्या तासांबद्दल बोलायचे. शिक्षकांनी अशा प्रकारे काम करणं आता थांबवायला हवं, असं त्यांचं म्हणणं होतं. भविष्यात त्यांना यावरच काम करायचं होतं, असं साचिको सांगतात. आज साचिको आपल्या नवऱ्याची इच्छा असलेलं काम पुढे नेत आहेत. कारोशीनं होणारे मृत्यू रोखण्यासाठी काम करणाऱ्या ‘ॲण्टि कारोशी’ चळवळीत त्यांनी सहभाग घेतला आहे.

इतर विकसित देशांतले शिक्षक आठवड्याला सरासरी ३८ तास काम करतात तर जपानमधले शिक्षक आठवड्याला ५६ तास काम करतात. ते सुटीच्या दिवशीही कामात व्यस्त असतात. जून २०२२ मध्ये ‘ॲडव्हान्समेन्ट ऑफ लिव्हिंग स्टॅण्डर्स’ या संशोधन संस्थेने १०,०१० शिक्षकांचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात की, शाळेशिवाय घरूनही शिक्षकांना काम करावं लागतं. तो वेळ विचारात घेतला तर जपानमधले शिक्षक १२ तास ७ मिनिटं काम करतात. आदर्श कामाची वेळ  ७ तास ४५ मिनिटं मानली जाते.  कामकाजाच्या दिवशीचे आणि सुटीच्या दिवशीचे कामाचे तास एकत्र केल्यास दर महिन्याला जपानमधील शिक्षक २९३ तास ४६ मिनिटं काम करतात. आदर्श वेळेपेक्षा प्रत्येक शिक्षक दर महिन्याला १२३ तास जास्त काम करतो.  कामाच्या अति ताणानं शारीरिक आणि मानसिक ताणाचा धोका बघता आता जपानमधले तरुणही नको ती शिक्षकाची नोकरी असं म्हणू लागले आहेत. 

जपानमधील या कार्यसंस्कृतीच्या विरुद्ध आता आवाज उठवले जात आहेत. न्यायालयात कामाच्या अति ताणासंबंधीचे खटले दाखल केले जात आहेत. जून २०२२ मध्ये ३४ वर्षीय निशिमोटो यांनी अति कामामुळे आलेल्या ताणाबद्दल खटला दाखल केलेला होता. त्या खटल्याचा निकाल निशिमोटो यांच्या बाजूने लागला. त्यांना अति कामामुळे आलेल्या ताणाची नुकसानभरपाई देण्यात आली.

सरकारनं कामाच्या संस्कृतीत बदल करण्यासंदर्भात गंभीरपणे पावलं उचलायला हवीत, असं येथील  शिक्षकांचं मत आहे. तर सरकारनं आता शिक्षकांच्या कार्यसंस्कृतीत बदल करण्याच्या दृष्टीनं सुधारणा करायला सुरुवात केली असल्याचं येथील शिक्षणमंत्र्यांचं म्हणणं आहे. मुलांना शिकवणं हे अतिशय पवित्र काम आहे. ते करणं शिक्षकांना आवडतंही, पण कारोशीनं दरवर्षी होणाऱ्या हजारो मृत्यूंकडे आता डोळेझाक करून चालणार नाही, हे जपानमधील शिक्षकांच्या लक्षात आलं आहे.

कारोशीची भीतीअति कामाच्या ताणाने लोकांचे मृत्यू होत आहेत, हे जपानच्या सरकारलाही मान्य आहे. पण सरकार सांगत असलेली आकडेवारी आणि ॲण्टि कारोशी चळवळ सांगत असलेलं कारोशी मृत्यूंचं वास्तव यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ॲण्टि कारोशी चळवळ दरवर्षी दहा हजारांपेक्षा जास्त मृत्यू होतात असं सांगते. अति कामामुळे येणारा ताण, त्यामुळे होणारे आजार, अपघात, त्यातून येणारे अंपगत्व यासाठीची सरकारकडे भरपाई मागणाऱ्यांची संख्याही वर्षाला १०० ते ३०० एवढी आहे. सरकारनं योग्य पावलं उचलली नाहीत तर कारोशीचं प्रमाण वाढत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Japanजपान