सोशल मीडियावर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात तरुणांनी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनामुळे नेपाळमधील परिस्थिती चिघळली असून, आंदोलकांनी नेपाळ सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानांना लक्ष्य केल्यानंतर आता नेपाळमधील संसद भवनाकडे मोर्चा वळवला आहे. या आंदोलकांनी संपूर्ण संसद भवन ताब्यात घेतलं असून, त्यांनी संसद भवन पेटवले आहे. दरम्यान, आंदोलनामुळे सरकारच्या झालेल्या चौफेर कोंडीच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नेपाळमध्ये सरकारविरोधातील आंदोलन दुसऱ्या दिवशी अधिकच हिंसक झालं आहे. काठमांडूसह अनेक शहरांमध्ये तरुण आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. आंदोलकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल खासगी निवासस्थानावर ताबा मिळवून, ते पेटवून दिले आहे. सोमवारी गृहमंत्री पदाचा राजीनामा देणारे रमेश लेखक, परराष्ट्र मंत्री डॉ. आरजू राणा देउबा, दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग आणि ऊर्जा मंत्री दीपक खड़का यांच्या घरांचीही तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली.
याबरोबरच पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या पक्षाचे नेते रघुवीर महासेठ आणि माओवादी पक्षाचे अध्यक्ष प्रचंड यांच्या निवासस्थानांवरही हल्ले झाले होते. या आंदोलनादरम्यान, पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यावरही राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव येत होता. अखेरीस शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आंदोलकांनी थेट संसद भवनाकडे कूच करत त्याला आग लावली आहे.